भिवंडी : काेराेनाकाळात सर्वच व्यवहार ठप्प असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटले हाेते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हेगारीत अचानक वाढ झाली आहे. लॉकडाऊनकाळात कोरोना नियमांचे उल्लंघनाचे गुन्हे वगळता गंभीर गुन्ह्यांची नाेंद झाली नव्हती. भिवंडी परिमंडळ २ अंतर्गत नारपोली, कोनगाव, शांतीनगर, निजामपुरा, भिवंडी शहर व भोईवाडा ही पाेलीस ठाणी आहेत. दुसऱ्या लाटेनंतर लसीकरण सुरू झाल्याने व कोरोना नियंत्रणात आल्यानंतर निर्बंध शिथिल झाले. त्यानंतर जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यांत गुन्ह्यांत पुन्हा वाढ झाली आहे. जुलैमध्ये ३०५ गुन्हे, तर ऑगस्ट २०२१ मध्ये २५७ अशा ५६२ गुन्हे नाेंदवले गेले. यातील अनेक गुन्ह्यांची उकलही पाेलिसांनी केली आहे.
एप्रिल ते सप्टेंबर २०२० या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांत १,१३३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०२० पासून काेराेनाची पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले हाेते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्यांच्या काळात भिवंडीतील परिमंडळ २ अंतर्गत पाेलीस ठाण्यांत ६४७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, तर जानेवारी २०२१ ते जून २०२१ या कालावधीत राज्यात दुसरा लॉकडाऊन करण्यात आला. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये १,४३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली हाेती.
भिवंडीतील विविध पोलीस ठाण्यांत वाहनचोरी, मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भिवंडी परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस पथक तैनात केल्याने अनेक दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या व या चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्याचबरोबर मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांचीही गंभीर दखल घेत मोबाइल चोरट्यांच्याही मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरीचे मोबाइलही हस्तगत केले असून शुक्रवारी शांतीनगर या एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभर मोबाइल चव्हाण यांच्या उपस्थितीत नागरिकांना परत करण्यात आले आहेत.