ठाणे : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असताना आता ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात साथरोगांचे प्रमाण काही महिन्यांत वाढताना दिसत आहे. डेंग्यू, मलेरियासह इतर आजारांमुळे जिल्ह्यातील नागरिक आता हैराण झाले आहेत. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, त्या कुठे तरी अपुऱ्या पडत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच जिल्ह्याच्या विविध भागात जुलै महिन्यापासून मलेरिया, डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळल्याचे दिसत आहे. हे साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून धूरफवारणी तसेच विविधउपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्यावर्षी जुलै महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात मलेरियाचे १९१, तर डेंग्यूचे १२३ रुग्ण आढळले होते. यंदाच्या वर्षी मलेरियाचे २२२ तर, डेंग्यूचे ७४ रुग्ण आढळले आहेत. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मलेरिया रुग्ण संख्येत वाढ झाली असून, डेंग्यूची रुग्णसंख्या कमी झाली आहे.
यंदा जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या कालावधीत दोन लाख ६९ हजार १९८ जणांची मलेरियाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २२२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी जुलै महिन्यात सर्वाधिक म्हणजेच ८२ रुग्ण आढळले. तसेच याच कालावधीत ८४ संशयित डेंग्यू रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यामध्ये ७४ रुग्ण आढळले. जुलै महिन्यात चार जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. तसेच मार्च महिन्यात एका डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जुलै अखेरपर्यंत आढळलेले रुग्ण
क्षेत्र - डेंग्यू - मलेरिया
महापालिका क्षेत्र - ३३ - १९४
नगर परिषद - ६ - १३
ठाणे ग्रामीण - ३५ - १५
एकूण - ७४ - २२२