भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेने बंदरवाडी स्मशानभूमीत बसवण्यात आलेल्या चिमणीतील कॉम्प्रेसरची क्षमता कमी झाल्याने परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास होत आहे. या त्रासातून स्थानिकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने तेथील चिमणीची क्षमता वाढवण्याची मागणी ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पाटील यांच्यासह नगरसेविका कल्पना म्हात्रे, महेश म्हात्रे, नंदू पाटील उपस्थित होते. पालिकेने शहरातील काही स्मशानभूमींना अद्ययावत लूक देण्यास सुरुवात केली असली, तरी काही स्मशानभूमींमध्ये सुविधांची वानवा आहे. बंदरवाडी स्मशानभूमीचा यात समावेश आहे. या स्मशानभूमीतील धूर पूर्वी परिसरात पसरायचा. यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने धूर थेट वर जाण्यासाठी चिमणी बसवण्याची मागणी पालिकेकडे केली. प्रशासनाने ३० लाखांचा खर्च करून चिमणी बसवली. देखभाल, दुरुस्तीचे कंत्राटही देण्यात आले. परंतु, चिमणीद्वारे वर फेकण्यासाठी बसवण्यात आलेल्या कॉम्प्रेसरची क्षमता कमी असल्याने पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झाली. चिमणीची क्षमता वाढवण्यात यावी, यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर, नगरसेवक पाटील यांनी स्मशानभूमीला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्या वेळी धूर परिसरातच पसरत असल्याचे दिसून आले. यामुळे चिमणीची क्षमता वाढवण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)
स्मशानभूमीतील चिमणीची क्षमता वाढवा
By admin | Published: March 17, 2017 6:09 AM