भिवंडी: वीज वितरण करणाऱ्या महावितरण कंपनी कडून अतिरिक्त इंधन समायोजन शुल्कात नोव्हेंबर पासून वाढ केल्याने वीज बिलात वाढ होणार असल्याची माहिती भिवंडी शहरात वीज वितरण करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनी प्रशासनाने गुरुवारी दिली आहे. महावितरण कडून सप्टेंबर मध्ये अतिरिक्त इंधन शुल्क वाढ केली होती त्यानंतर पुन्हा या महिन्यात त्यामध्ये सुमारे ६० ते ७० टक्के वाढ केल्याने वीज ग्राहकांवर अतिरिक्त वीज बिलाचा भार वाढणार आहे.महावितरण कंपनीने ३० सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून इंधन समायोजन शुल्क लागू केले होते. त्या नंतर ४ डिसेंबर रोजी या दरामध्ये वाढ केल्याचे सुधारित परिपत्रक काढले आहे.
या परिपत्रका नुसार नोव्हेंबर महिन्याचे सरासरी इंधन शुल्क २९ पैसे आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या बिलाच्या तुलनेत निवासी वीज ग्राहकांसाठी सरासरी १० ते ३० पैशांची वाढ प्रति युनिट होणार आहे. तर यंत्रमाग वीज ग्राहकांसाठी २० अश्वशक्ती साठी ७ पैसे तर २० अश्वशक्ती पेक्षा जास्त असलेल्या ग्राहकांसाठी १० पैसे असे वाढीव अतिरिक्त इंधन समायोजन शुल्क आकारणी लागू होणार आहे. तरी वीज ग्राहकांनी आपले नियमित वीज बिल भरून टोरंट पॉवर कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन टोरंट पावरने केले आहे.