ठाणे :
ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात स्वाईन फ्लुच्या रुग्णांची वाढ होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र सर्वाधिक रुग्ण हे ठाण्यात वाढत असून महापालिकेची आरोग्य यंत्रणा त्या दृष्टीने सर्तक झाली आहे. मागील काही दिवसात जिल्ह्यात या आजाराचे ३४ रुग्ण आढळले असून त्यातील तिघांचा मृत्यु झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर यामध्ये दोन जण ठाण्यातील तर एक जण ग्रामीण भागातील असल्याचे दिसत आहे. याचाच अर्थ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही स्वाईन फ्लूने दस्तक दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता जिल्हा आरोग्य यंत्रणाही सर्तक झाल्याचे दिसत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नाही तोच, स्वाईन फ्लूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यातच जिल्ह्यात पावसाळ्याच्या कालावधीत साथीचे आजार पसरू नये याकरिता, जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना आपापल्या क्षेत्रात औषध फवारणी करण्याच्या व उपययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना, देखील जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील सहा महापलिका दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागात आतापर्यंत १ लाख १७ हजार ५९० संशयितांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ३४ जणांच्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी २२ जणांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून ६ जणांनी आजारावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २० रुग्ण आढळून आल्याची नोंद करण्यात आली असून दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ९ रुग्ण आढळून आले असून सुदैवाने यात एकही रुग्ण दगावला नसल्याचे दिसून येत आहे. तर, ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले असून एक रुग्ण दगावला आहे.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात २० बेड्स सज्ज ठाणे पालिका क्षेत्रात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा विचार करता, स्वाईन फ्लू साठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील २० खाटांचा विशेष कक्ष सुरु करण्यात आला असून सध्याच्या घडीला यामध्ये एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली