उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असल्याने, डॉक्टर, नर्सवर ताण वाढल्याचे चित्र रुग्णालयात आहे. यातूनच रुग्णांची हेडसांड होत असून रुग्णालयात उपलब्ध बेड पेक्षा रुग्णांची संख्या जास्त झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण दररोज येत येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ताप, सर्दी-खोकला, मलेरिया सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने, रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. अशी माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. यापूर्वी सरासरी ९५० रुग्ण संख्याची नोंद बाह्यरुग विभागात होत होती. तसेच रुग्णालयात २०० बेडचे असतांना ३०० पेक्षा जास्त रुग्ण ऍडमिट करण्यात आले. अचानक वाढलेल्या रुग्णामुळे डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींची दमछाक होत असून रुग्णांचीही हेडसांड होत असल्याची कबुली डॉ बनसोडे यांनी दिली आहे.
महापालिका आरोग्य विभाग मात्र व्हायरल तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे सांगत आहे. महापालिका आरोग्य केंद्रात सुखसुविधा उपलब्ध नसल्याने, रुग्ण त्याकडे फिरकत नाही. महापालिकेने अंटेलिया येथे बांधलेल्या रुग्णालयात कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी केले. मात्र रुग्णालय सुरू करण्याला महापालिकेला अपयश आले असून खरेदी केलेले कोट्यवधीचें साहित्य भंगारात निघाले आहे. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. महापालिकेने वेळीच रुग्णालय सुरू केले असतेतर, आज मध्यवर्ती रुग्णालयात होत असलेली रुग्णांनी हेडसांड झाली नसती. अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या महापालिका रुग्णालय खाजगी ठेकेदाराच्या घशात घालण्याचा डाव असल्याची टीकाही शहरातून होत असून महापालिका आरोग्य विभागावर सर्वत्र टीका होत आहे.
महापालिका आरोग्य विभाग नावालाच महापालिकेचे रिजेन्सी अंटेलिया येथे बांधलेले रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. कोरोना काळात महापालिकेने कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व अन्य कर्मचारी यांची नियुक्ती बंद असलेल्या महापालिका रुग्णालयात केली असतीतर, आज रुग्णांना सेवा देता आल्या असत्या. तसेच डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडीत निघाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.