मीरारोड : मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते . मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कडे पाठपुरावा केल्या नंतर ८ जून पासून शहराला ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून दिले असून आणखी ५ दशलक्ष लिटर पाणी सुद्धा लवकरच वाढवून मिळेल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे . यामुळे दर आठवड्याच्या शट डाऊन मुळे पाणी समस्येचा नागरिकांचा त्रास काही अंशी कमी होईल असे त्यांनी सांगितले .
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून मीरा भाईंदर शहराला १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे . परंतु एमआयडीसी मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी देत होती . त्यातच विविध दुरुस्ती आणि देखभाल कामे , जलवाहिनी फुटणे आदी कारणांनी शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत होण्यास चार चार दिवस लागतात . आधीच पाणी कमी मिळते त्यात शटडाऊन मुळे आणखी पाणी टंचाई लोकांना सहन करावी लागत असते असे आ .सरनाईक म्हणाले .
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पाण्यात वाढ करण्यासाठी तसेच मंजूर कोट्यानुसार १२५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मिळावा या साठी शासन आणि एमआयडीसी कडे पाठपुरावा केला जात होता . महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारवी जलशुध्दीकरण केंद्र येथील काही कामे तसेच कटईनाका ते शिळफाटा पर्यंतची जलवाहिनी कामे अपुर्ण असल्यामुळे ती पुर्ण झाल्याशिवाय पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे गेल्या ३ - ४ वर्षां पासून प्रशासन सांगत होते .
गेल्या काही दिवसात सलग शटडाऊन मुळे तसेच पाण्याची गळती कारणांनी शहरातील पाणी पुरवठ्यावर जास्तच विपरीत परिणाम झाला होता . त्यामुळे अनेक भागात ३ - ३ दिवस पाणी लोकांना मिळाले नाही अश्या तक्रारी वाढल्या . शहरातील सद्याची तसेच भविष्यातील पाण्याची मागणी पुर्ण करण्यासाठी सुर्या प्रकल्पातून शहरासाठी सुमारे २१८ एम.एल.डी. पाणी पुरवठा योजना मंजूर असून त्याला आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे . सूर्याचे पाणी मिळणे सुरु होताच शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे .
परंतु सद्यस्थितीत होत असलेल्या पाणी पुरवठ्यात किमान १० दशलक्ष लिटर पाणी तात्काळ वाढवून देण्या संदर्भात आ . सरनाईक यांच्या मागणी नुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे नुकतीच बैठक झाली . त्या बैठकीत मंत्री सामंत यांनी मंजूर कोट्यानुसार मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करावा असे निर्देश दिले .
त्यानुसार ८ जून पासून शहराला एमआयडीसी कडून आणखी ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून मिळाले आहे . त्यामुळे एमआयडीसी कडून १२० दशलक्ष लिटर पाणी मिळू लागले असून उर्वरित ५ दशलक्ष लिटर पाणी सुद्धा लवकरच मिळेल असे आ . सरनाईक म्हणाले .