ठाणे : ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याविरुद्ध आणखी एक तक्रारदार महिला पोलीस पुढे आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली असून तक्रारींची संख्याही पाचवर गेली आहे. दरम्यान, त्यांच्या अटकपूर्व जामीनाची सुनावणीही आता १२ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर गेली आहे.शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली. या जामीन अर्जाची सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार होती. ती होण्यापूर्वी त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला. दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी होणारी अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आता १२ फेब्रुवारी रोजी होणार असल्यामुळे ती लांबणीवर पडली आहे. महिला पोलिसांच्या लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे यांनीही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून ठाणे पोलिसांनी न्यायालयात आरोपींची जोरदार बाजू मांडून प्रयत्न करावेत. त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक होईल इतपर्यंत फिर्यादींची भक्कमपणे बाजू मांडावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, २४ जानेवारी २०१८ रोजी याप्रकरणी पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर याच तक्रारीमध्ये त्यापाठोपाठ चार तक्रारी दाखल झाल्या होत्या. आता पुरवणी तक्रारीमध्ये पाचव्याही महिलेने पुढे येऊन कैफियत मांडल्यामुळे या तक्रारीची व्याप्ती आणखी वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विशाखा समितीच्या चौकशीमध्ये दहा महिलांनी शिंदे यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यातील पाच जणींची रितसर तक्रारही दाखल झाली आहे. विशाखा समितीच्या शिफारशीनंतर शिंदे यांना खात्यातून पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी निलंबितही केले आहे.
ठाण्याचे निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदेंविरुद्ध विनयभंगाच्या तक्रारींमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 8:25 PM
मुख्यालयाचे निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याविरुद्ध आणखीही एका महिला पोलिसाने तक्रार दाखल केल्यामुळे तक्रारदारांची संख्या पाचवर गेली आहे.
ठळक मुद्देमहिला पोलीस विनयभंग प्रकरणआणखी एका तक्रारीमुळे संख्या पाचवरअटकपूर्व जामीनाची सुनावणी लांबणीवर