कल्याण : ‘मिस टिन वर्ल्ड’ या किताबावर न थांबता सुश्मिता सिंग हिने भविष्यात ‘मिस वर्ल्ड’च्या किताबावर आपले नाव कोरत कल्याण शहराचा नावलौकिक आणखी वाढवावा, अशी अपेक्षा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केली. मिस टिन वर्ल्ड झाल्याबद्दल सुश्मिताचा कल्याण बिझनेस कम्युनिटी आणि इतर प्रतिष्ठित नागरिकांतर्फे रविवारी ‘नागरी सत्कार’ करण्यात आला. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.काही दिवसांपूर्वी लॅटिन अमेरिकेत (एल सालवाडोर) ‘मिस टिन वर्ल्ड २०१९’ (मुंडीयाल) ही जागतिक सौंदर्य स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये सुश्मिताने भारताचे प्रतिनिधित्व केले. या पहिल्याच प्रयत्नात तिने थेट जागतिक सौंदर्य स्पर्धेच्या किताबावर नाव कोरले. यामुळे ऐतिहासिक कल्याण शहराचे नाव पुन्हा जगभर पोहोचले. सुश्मिताच्या या देदीप्यमान यशाबद्दल कल्याण बिझनेस कम्युनिटीसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊ न तिचा नागरी सत्कार केला. या सोहळ्याला उपस्थित खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे, आमदार नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदींनी आपल्या भाषणात सुश्मिताचे कौतुक केले. तर, मिस टिन वर्ल्ड स्पर्धा घेणाऱ्या संघटनेचे संचालक फ्रान्सिस्को कोरटेझही सोहळ्याला उपस्थित होते.हा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी विमल ठक्कर, रवी जैन, महेंद्र मुनोत, विनोद सत्रा, डॉ. प्रशांत पाटील, निलेश जैन आदींनी विशेष परिश्रम घेतले. सोहळ्याला शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी, नगरसेविका शालिनी वायले, माजी नगरसेवक सुनील वायले, अस्तित्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष जतीन प्रजापती, मुन्ना तिवारी, विकी गणात्रा आदी मान्यवरांसह कल्याणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आईवडिलांना आनंदाश्रूमुलीचा हा कौतुक सोहळा पाहून सुश्मिताची आई सत्यभामा, वडील नवीन सिंग यांचा ऊर अभिमानाने आणि डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. या सत्काराला उत्तर देताना सुश्मिता चांगलीच भावुक झाली होती. आपल्या आईवडिलांनी दाखवलेला विश्वास आणि या क्षेत्रातील आपले गुरू मेलवीन नरोन्हा यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन यामुळेच आपण हे शिखर गाठू शकलो, असे तिने सत्काराला उत्तर देताना सांगितले.
कल्याणचा नावलौकिक आणखी वाढव - रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 12:42 AM