लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे कोणत्याही नव्या प्रकल्पांची घोषणा न करता काटकसरीचा दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला होता; परंतु यात स्थायी समितीने ४९१ कोटींची वाढ सुचविली आहे. त्यामुळे तो तीन हजार २४६ कोटी ३२ लाखांवर गेला आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी मालमत्ता, पाणीपट्टी, जाहिरात, पार्किंग, शहर विकास विभाग, स्थावर मालमत्ता, सार्वजनिक बांधकाम अशा सर्व विभागांचे टार्गेट वाढविले असून, ४९१ कोटींची वाढ केली असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी दिली. आता तो महासभेच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ५ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला २०२०-२१ चे दोन हजार ८०७ कोटींचे सुधारित, तर २०२१-२२ चे दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा मूळ अर्थसंकल्प सादर केला. त्यावर स्थायी समितीने १५ दिवस चर्चा केल्यानंतर मंगळवारी मंजुरी दिली. सर्व विभागांशी चर्चा केल्यानंतर २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पात ११० कोटी ९३ लाखांची वाढ केल्याने सुधारित अर्थसंकल्प दोन हजार ९१७ कोटी ९६ लाखांवर गेला असून, मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ केली असल्याने तो तीन हजार २४६ कोटी ३२ लाखांवर गेला आहे.
कोरोनामुळे पालिकेचे उत्पन्न कमालीचे घटले असल्याने मूळ अर्थसंकल्पात प्रशासनाने एक हजार ३०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे जे प्रकल्प सुरू आहेत त्यांनादेखील ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती. याशिवाय नगरसेवकांना प्रभागात कामे करणे कठीण झाले होते. यासाठी मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ केल्याची माहिती सभापतींनी दिली. उत्पन्न वाढीसाठी मालमत्ताकरामध्ये १०० कोटी, जाहिरात फीमध्ये १७ कोटी ६३ लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग १० कोटी, स्थावर मालमत्ता भाड्यापोटी १९ कोटी, शहरविकास ३१३ कोटी, पाणीपुरवठा विभाग २५ कोटी इतर विभागांकडून सहा कोटी ३७ लाख, अशी ४९१ कोटींची वाढ केली आहे
मॉल, मल्टिप्लेक्समधील दुकानांना कर लागणार सर्वसामान्य ठाणेकर प्रामाणिकपणे कर भरतो. मात्र मल्टिप्लेक्स आणि मॉलमध्ये मोकळ्या जागेत अनेक दुकाने थाटली असून, याचा फायदा केवळ मॉलच्या मालकांना होतो. त्यामुळे महापालिकेचेदेखील नुकसान होत असून, त्यामुळे या सर्व दुकानांना मालमत्ताकर लावण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली.