ठाणे: कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्याकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तीन महिन्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ठाणे जिल्ह्यात ४६ हजार पदवीधर मतदारांची नोंद असून नवीन नोंदणी करून ही संख्या आणखी वाढवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बुधवारी केले.
निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी शिनगारे यांनी राजकीय पक्षांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. पात्र पदवीधरांना कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार यादीत यापूर्वी नाव नोंदणी केली असली तरी परत नव्याने नाव नोंदणी करावी लागणार आहे. यासाठीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, असे शिनगारे यांनी सांगितले.
दरम्यान, पदवीधर मतदारसंघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत, अशा सर्व पात्र पदवीधरांना नवीन यादी तयार करताना विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. पदवीधर मतदारसंघाच्या अर्हतेसाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे, त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे, १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी किमान ३ वर्षे भारताच्या राज्य क्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल, अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. तीन वर्षांचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि ते विद्यापीठ किंवा अन्य संबंधित प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले, त्या दिनांकापासून मोजण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात यापूर्वीच्या नोंदणीत ४६ हजार पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली होती. यावेळी यामध्ये आणखी वाढ हाेण्याची अपेक्षा आहे. पदवीधरांनी माेठ्या संख्येने नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा. या मतदारांची संख्या वाढावी, यासाठी राजकीय पक्षांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन शिनगारे यांनी केले. मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात १८ ठिकाणी पदनिर्देशित अधिकारी नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.