- पंकज पाटील, अंबरनाथभिवंडी आणि कल्याण लोकसभा क्षेत्रातील अनुक्रमे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना निवडणुकीच्या निमित्ताने पाण्याचे गाजर दाखवण्यात येत आहे. सध्या दोन्ही मतदारसंघांत पाण्याचा प्रश्न उमेदवारांना त्रासदायक ठरत आहे. त्रास कमी करण्यासाठी वाढीव पाणी आधीच मंजूर असून त्याचे लवकरच वाटप केले जाणार असल्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या मतदारांना अप्रत्यक्ष आमिष दाखवण्याचे काम आता प्रचारादरम्यान केले जात आहे.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही शहरांची वितरणव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी प्राधिकरणाकडे आहे. दोन्ही शहरांसाठी सरासरी १०० दशलक्ष लीटर पाणी उल्हास नदीतून उचलण्यात येते. मात्र, गेल्या १० वर्षांत अंबरनाथ, बदलापूरसाठी वाढीव पाणी मंजूर झालेले नाही. त्यामुळे आहे त्या पाण्यावर तहान भागवण्याची वेळ आली आहे. त्यातच प्राधिकरणाच्या वितरणव्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. सरासरी ३५ टक्के पाणीगळती असल्याने खरी टंचाई गळतीमुळे निर्माण झाली आहे. ही त्रूटी भरून काढण्यासाठी प्राधिकरण सक्षम कामे करत नाहीत. अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना पाणी समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे. एकीकडे नागरिक पाण्यासाठी चिंतित असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पाण्याच्या प्रश्नावर उमेदवार काहीएक बोलू शकत नसल्याने आता खोटी आश्वासने पुढे केली जात आहेत. अंबरनाथसाठी २० आणि बदलापूरसाठी ३० असे एकूण ५० दशलक्ष लीटर पाणी मंजूर झाले असून तो पाणीपुरवठा जून, जुलैपासून सुरू होईल, अशी बतावणी केली जात आहे. ज्या शहराला मागील १० वर्षांत दोन ते पाच दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मिळाले नाही. या शहरांसाठी थेट ५० दशलक्ष लीटर पाणी येणार म्हणजे नागरिकांना आश्चर्याचा धक्का देणारी बाब म्हणावी लागेल. अर्थात, नागरिकही या आश्वासनाला गांभीर्याने घेत नाही. मुळात हे अतिरिक्त पाणी जे मिळणार आहे, ते केवळ बारवी धरणाचे काम पूर्ण झाल्यावरच. मागील पाच वर्षांपासून बारवीच्या दरवाजांचे काम झालेले असतानाही धरणात अतिरिक्त पाणी साठवता आलेले नाही. पुनर्वसन आणि भरपाईचे विषय अजूनही प्रलंबित असल्याने यंदाही धरणात पूर्ण क्षमतेने पाणी भरेलच, याची ग्वाही अधिकारीही देत नाहीत.पावसाळा सुरू झाल्यावर धरणातील साठ्यात वाढ होईल. त्यामुळे मंजूर पाणी उपलब्ध झाले तरी प्राधिकरण तेवढे पाणी उचलणार की नाही, हाही प्रश्न सुटलेला नाही. अंबरनाथला अतिरिक्त ५ ते १० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाल्यास समस्या सुटण्यासारखी आहे. अशा परिस्थितीत या शहरासाठी २० दशलक्ष लीटर पाणी उचलणार का, हा प्रश्न सुटलेला नाही. तर, दुसरीकडे बदलापूरला ३० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाले, तरी त्या अतिरिक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता आहे का, याचाही विचार करण्याची गरज आहे.निवडणूक कुठलीही असो, मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जाते. त्यातील किती पूर्ण होतात, किती हवेत विरतात, हे आता मतदारांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे अशा आश्वासनांना मतदारही आताही गांभीर्याने घेत नाही, ही विचार करायला लावणारी बाब आहे.किती पाणी उचलायचे हे गुलदस्त्यातभविष्याचा विचार करून दोन्ही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण मंजूर केले जात आहे. मात्र, यातील किती पाणी उचलायचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीचा काळ सुखात जावा, यासाठी राजकीय पुढारी पाण्याच्या वाढीव आरक्षण मंजुरीचे गाजर दाखवत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याला मतदार साथ देतील की नाही, हे अजूनही स्पष्ट नाही.
निवडणुकीत वाढीव पाण्याचे गाजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 2:11 AM