डोंबिवली : पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली येथील गणेश घाटावर सोमवारी पाच दिवसांचे गणपती आणि गौरींचे विसर्जन झाले. या वेळी भाविकांनी जमा केलेल्या निर्माल्यातून दोन टन कचरा गोळा करण्यात आला. खत तयार करण्यासाठी हा कचरा गणेश मंदिर संस्थानातर्फे चालविल्या जाणाऱ्या प्रकल्पाकडे सुपुर्द केला जाणार आहे.गणेश घाटाचा विकास शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. तेथे जेटी, हायमास्ट दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सध्या तेथे मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाचे काम सुरू आहे. गणेश घाटाकडे जाताना अडचण येऊ नये, यासाठी भक्तांसाठी व्यवस्था केली आहे. पर्यावरण संस्थेचे कार्यकर्ते तेथे निर्माल्य गोळा करतात. त्यातून प्लास्टिक आणि कचरा वेगळा केला जातो. पेंढरकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचाही त्यासाठी मदत करतात. अनंत चतुदर्शीपर्यंत हे काम चालणार आहे. आतापर्यंत दोन टन कचरा जमा झाला आहे. भक्तांनीही हा कचरा जमा केल्याने त्यांच्यात पर्यावरणविषयक जागरूकता वाढत असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळाले.कुंभारखान पाड्यातील गणेशघाट विकसित करण्यासाठी भाजपा नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे सरकारकडून तीन कोटींचा निधी केला. तेथेही जेटी बांधली आहे. तर, जॉगिंग ट्रकचे काम सुरू आहे. या घाटावर सोमवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंडळाचे कार्यकर्ते निर्माल्य गोळा करून विघटित करण्याचे काम करत होते. एक ट्रकभर कचरा तेथे जमा झाला. कचºयापासून खत तयार करणाºया संस्थेला हा कचरा दिला जाणार आहे, असे मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप सावंत यांनी सांगितले.दरम्यान, गणेश भक्तांना म्हात्रे यांच्यातर्फे मानाचे श्रीफळ देण्यात आले.शाडूच्या मूर्तींचे घरीच विसर्जन, एमआयडीसी निवासी विभागातील नागरिकांचा पुढाकारडोंबिवली : उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा समतोल राखा, असे आवाहन सरकारी यंत्रणा तसेच पर्यावरणप्रेमींकडून केले जात आहे. मिलापनगरमधील ४५ रहिवाशांनी शाडूच्या गणपती मूर्तींचे विसर्जन घरोघरी करत पर्यावरण रक्षणाचा संदश दिला.कल्याणमध्ये २७ तर डोंबिवलीत ३७ विसर्जनस्थळ आहेत. परंतु, जलप्रदूषण टाळण्यासाठी कल्याण पूर्वेतील गावदेवी मंदिर तिसगाव, चिंचपाडा रोड, कोळसेवाडी पोलीस ठाण्याजवळ, पश्चिमेत मुंबई विद्यापीठ उपकेंद्र अशा चार ठिकाणी तर, डोंबिवली पूर्वेतील पंचायत बावडी, नेहरू मैदान, अयोध्या नगरी, शिवम हॉस्पिटल, टिळक विद्यामंदिर शाळा, प्रगती कॉलेज, कस्तुरी प्लाझा, न्यू आयरे रोड, उदंचन केंद्र येथे कृत्रिम तलाव बांधले आहेत.डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगर सम्राट चौक, भागशाळा मैदान येथे घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाच्या धर्तीवर प्लास्टिकची मोठी पिंपे ठेवली आहेत. डोंबिवली एमआयडीसी मिलापनगरमधील रहिवाशांनी घरातील पिंपांमध्ये तसेच मोठ्या बादलीमध्ये सोमवारी पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले.मूर्ती विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना घातले. तर राहिलेली माती मूर्तिकारांना दिली. विसर्जनाच्या वेळी होणारे जलप्रदूषण रोखण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
गणेशभक्तांमध्ये वाढली पर्यावरणविषयक जागरूकता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 4:00 AM