पंढरीनाथ कुंभार।भिवंडी : सतत पडणारा पाऊस आणि पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने भिवंडीत गजकर्णाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ४०० बाह्यरूग्णांपैकी १२५ जणांना याची लागण झाली आहे.जिल्ह्यातील पावसाच्या नोंदीत यावर्षी भिवंडीत पावसाचे प्रमाण जास्त झाले आहे. ढगाळ हवामान व पावसामुळे हवेत दमटपणा आला आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. शहरात अनेक ठिकाणी पसरलेले कचºयाचे साम्राज्य आणि नियमित शहरात जंतुनाशक औषधांची फवारणी न झाल्याने अनेक ठिकाणी जंतुचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशुध्द पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी नागरिकांना बोअरिंगचे पाणी प्यावे लागत आहे. या सर्व कारणांनी नागरिकांच्या अंगाला खाज येण्याचे प्रमाण वाढले आहे. या खाजेचे काही ठिकाणी गजकर्णात रूपांतर झाले आहे. झोपडपट्टी व दाट वस्तीच्या ठिकाणी अशा रूग्णांत वाढ झाली आहे. कोंबडपाडा,संगमपाडा व म्हाडा कॉलनी या भागातील काही नागरिकांच्या अंगावर काळे डाग पडण्यास सुरूवात झाली आहे. या बाबत पालिकेच्या आरोग्य विभागास कोणतीही माहिती नाही. तसेच या आजारावर उपचार करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य केंद्रात पुरेसा औषध पुरवठा होत नसल्याने रूग्णांना बाहेरून औषधे आणावी लागत आहेत.
भिवंडीत गजकरर्णाच्या रूग्णांत झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:13 AM