ठाणे : वाढत्या लोकसंख्येमुळे दिवा शहरातील नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत होते. येथे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असला तरी त्याचे व्यवस्थापन व नियोजन हे ठाणे महापालिका करते. येथील पाणीसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा सुरू होता. त्याला यश येऊन १० एमएलडी पाणी उपलब्ध झाल्याची माहिती माजी उपमहापौर व शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी दिली.
२०१७ मध्ये दिवा शहरासाठी २१.५० एमएलडी पाणीपुरवठा मंजूर होता. परंतु, लोकसंख्येचा विचार करता आणखी २० एमएलडी पाण्याची आवश्यकता होती. त्यासाठी गेल्या वर्षी मंत्रालयात तत्कालीन जलसंपदामंत्री व एमआयडीसी यांच्या स्तरावरील बैठकीत २० एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी तत्काळ १० एमएलडी पाणी उपलब्ध झाले. मात्र, तांत्रिक कारणास्तव १० एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकले नव्हते. ती तांंत्रिक अडचण दूर झाल्याने दिव्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.