कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नाहीय. रुग्णांची संख्या नेमकी कोणत्या वस्तीत वाढते, याचे निरीक्षण मनपाच्या आरोग्य विभागाने केले असता इमारतींमधील रुग्ण वाढत आहेत. इमारतींमधील रहिवासी ‘होम क्वारंटाइन’चे नियम पाळत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे होम आयसोलेसनचे काटेकोर पालन होण्यासाठी मनपा आयुक्त सर्व सोसायट्यांच्या सचिवांना नव्याने नियमावली पाठवणार असून, त्याचे पालन करण्याची सक्ती केली जाणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मनपा हद्दीतील रुग्णसंख्या रविवारपर्यंत ३१,५०३ वर गेली आहे. सध्या ३,८२३ रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण २७ हजार रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ६७८ जणांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीत दररोज नवीन ४०० ते ४५० रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला मनपा हद्दीत असेले १० हॉटस्पॉट आता ४४ वर गेले आहेत. त्यामुळे तेथे लॉकडाऊन कायम असेल, असे आयुक्तांनी १ सप्टेंबरला काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
मनपा हद्दीत दाट लोकवस्तीचे प्रभाग जास्त आहेत. तेथे चाळवजा घरे आणि झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहेत. आॅगस्टमध्ये आयुक्तांनीच माहिती दिली होती की, हॉटस्पॉटमध्ये १५ दिवसांच्या कालावधीत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या स्थिरावत आहे. मात्र, संख्या कमी कधी होणार, याविषयी ठोस दावा प्रशासनाने केला नव्हता.
कल्याण पश्चिमेतील जोशीबागेतील एकाच इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब नुकतीच उघडकीस आली होती. त्यामुळे नवीन रुग्ण नेमक्या कोणत्या लोकवस्तीतील आहेत, याचे निरीक्षण आरोग्य विभागाने केले. त्यात चाळ, झोपडपट्टी आणि इमारतींचे सर्वेक्षण केले असता कोरोनाचे रुग्ण हे इमारतीत जास्त आढळून येत आहेत.
नव्या रुग्णांच्या संख्येनुसार इमारतीत राहणाºया रुग्णांची टक्केवारी ८० इतकी आहे. चाळ आणि झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण कमी आढळून येत आहेत. इमारतीत कोरोना रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येण्याचे कारण इमारतीमधील नागरीक होम आयसोलेशनचे नियम पाळत नाहीत अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.
सोसायट्यांना बजावणार नोटिसा
महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व प्रभाग अधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांसह पोलीस उपायुक्तांसोबत बैठक घेतली. त्यानुसार, सर्व सोसायट्यांच्या सचिवांना नियमावलीचे पालन करण्यासाठी नव्याने नोटिसा पाठविल्या जाणार आहेत. त्याचे पालन काटेकोरपणे करण्यात आले नाही, तर संबंधित सोसायटीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.