मीरा रोड - तिशीतील तरुणांमध्ये पक्षाघाताचे ( ब्रेन स्ट्रोक ) वाढते प्रमाण गंभीर असल्याचे सांगतानाच स्थूलपणा, मानसिक ताणतणाव, शरीराची कमी हालचाल आदी कारणांनी पक्षाघात होतोच. शिवाय नागरिकांमध्ये वाढते मधुमेहाचे प्रमाण, तरुणांमध्ये धूम्रपान व मध्यपानाच्या वाढत्या प्रमाणामुळे हृदयासंबंधी आजारसुद्धा पक्षाघातास करणीभूत आहे, अशी माहिती मेंदू विकारतज्ज्ञ डॉ .सिद्धार्थ खारकर यांनी दिली . पक्षाघाताची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि तो झाल्यावर केली जाणारी तत्काळ उपाययोजना याविषयी जनजागृती करण्यासाठी मीरा रोड येथे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.प्रतिवर्षी जगात 2 कोटी लोकांना पक्षाघाताची बाधा होत असून, भारतात हे प्रमाण वाढत आहे. भारतात 12 लाख लोक पक्षाघातामुळे त्रस्त आहेत. तर याच विकाराने आतापर्यंत 7 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. हा विकार झालेल्या बहुतांश व्यक्ती 45 पेक्षा कमी वयोगटातील आहेत. पक्षाघातामुळे रुग्णाचा मृत्यू झाला नाही तरी कायमचे अपंगत्व येते. भारतातील 66 लाख लोक हे पक्षाघातातील अपंगत्वाने पीडित आहेत. तर दरवर्षी सुमारे दीड लाखाहून अधिक नागरिकांना पक्षाघाताचा झटका येतो, असे इंडियन कौन्सिल ऑफ इंडियाने काही वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे.स्थूलपणा, मानसिक ताणतणाव, शरीराची कमी हालचाल तसेच इतर अनेक कारणांमुळे ब्रेन स्ट्रोक होण्याची भीती असते. शहरातील नागरिकांमध्ये वाढत असलेले मधुमेहाचे प्रमाण, पाश्चात संस्कृतीमुळे तरुणांमध्ये स्मोकिंग व दारूचे वाढत असलेले प्रमाण तसेच बैठ्या जीवनशैलीमुळे वाढत असलेले हृदयासंबंधित आजार ही ब्रेन स्ट्रोक होण्याची मुख्य कारणे ठरत आहेत. यात सर्वात गांभीर्याचे म्हणजे तिशीतल्या तरुणांमध्ये हा आजार बळावत आहे, असे डॉ. खारकर म्हणाले.मलेरिया, क्षयरोग, एचआयव्ही-एड्सच्या तुलनेत पक्षाघाताने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवत वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात अथवा कायमस्वरूपी अपंगत्व येते. ऐन तारुण्यात पक्षाघाताने अर्धांगवायू होऊन अंथरुणाला खिळणारे युवक, विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण डॉक्टरांच्या चिंतेचा विषय बनला आहे. मेंदूचा तीव्र झटका जर एखाद्या गावात अथवा दाटीवाटीने राहणाऱ्या व्यक्तीला आला तर त्याला उपचार मिळेपर्यंत विलंब होतो व त्याचा मृत्यू होतो .मेंदूचा झटका म्हणजे काय असते याचेच ज्ञान आपल्या समाजात नाही. मेंदूचा झटका आल्यावर सहा तासात त्यावर शस्त्रक्रिया झालीच पाहिजे , नाहीतर आयुष्यभराचे लूळ होण्याची वेळ रुग्णावर येऊ शकते. चुकीची जीवन शैली व तीव्र धूम्रपान यामुळे हे प्रमाण वाढत चालले आहे. स्ट्रोक आल्यानंतर 70 टक्के व्यक्तींची ऐकणे आणि बघणे बंद होते. तर 30 टक्के व्यक्तींना पुढील आयुष्य जगण्यासाठी इतरांच्या मदतीची गरज भासते. साधारण 20 टक्के हृदयरोगाचा त्रास असणा-या व्यक्तींना या स्ट्रोकची समस्या होऊ शकते, परंतु जर स्ट्रोक आल्यावर तात्काळ उपचार केले तर तो पेशंट 15 दिवसात स्वतःच्या पायाने चालत घरी जातो. असे डॉ . खारकर म्हणाले .
तिशीमधील तरुणांमध्ये पक्षाघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 3:47 PM