ठाणे : बनावट ठरावाच्या आधारे वाढीव एफएसआय विकासकाला विकून ३२ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाºयांसह विकासकाविरूद्ध कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.घोडबंदर रोडवरील पुरूषोत्तम प्लाझा को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये दोन वर्षांपूर्वी हा प्रकार घडला. सोसायटीचे कोषागार रवींद्र थिटे यांनी याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष मोहन भोईर, सचिव राणी देसाई, जय डेव्हलपर्सचे भागीदार कमलेश राणावत आणि जितेंद्र देढिया, मे. शहा अॅण्ड देढिया एन्टरप्रायजेसचे गौरव देढिया, पियुष शहा आणि गौरव कन्स्ट्रक्शनस्चे भागीदार धर्मेन्द्र जिंदाल यांच्याविरूद्ध तक्रार दिली होती. १४ एप्रिल २0१६ रोजी सोसायटीची कोणतीही बैठक झालेली नसताना, सोसायटीचे अध्यक्ष मोहन भोईर आणि सचिव राणी देसाई यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यासाठी सोसायटीच्या सदस्यांच्या बनावट सह्या केल्या. या बनावट ठरावाच्या आधारे आरोपींनी विकासक आणि भागिदारांना कन्फर्मेशन डिड करण्याचे अधिकार प्रदान केले. आरोपींनी कन्फर्मेशन डिडची नोंदणी करून महापालिकेमध्ये कागदपत्रे सादर केली. त्यानंतर आवश्यक असलेली इतर कागदपत्रे आरोपींनी तयार केली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी सोसायटीच्या गार्डनचा एफएसआय बळकावला. रेडिरेकनरनुसार या जागेची किंमत २२ कोटी रुपये तर बाजारभावानुसार ३२ कोटी रुपये असल्याचा आरोप थिटे यांनी केला आहे.सोसायटीच्या आरोपी पदाधिकाºयांनी या व्यवहारामध्ये इतर आरोपींकडून ५५ लाख रुपये घेतल्याचा आरोपही थिटे यांनी केला आहे. तक्रारदाराने यासंदर्भात ठाणे न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.आरोपींनी दखलपात्र गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी निरिक्षण प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आर.टी. इंगळे यांनी नोंदविले. न्यायालयाच्या आदेशानुसार कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरूद्ध २२ मार्च रोजी गुन्हा दाखल केला.
सोसायटीचा वाढीव एफएसआय विकासकाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 2:08 AM