मुरलीधर भवारकल्याण : सध्या स्पर्धेच्या युगात फिटनेसला खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे आरोग्यविषयक सजगता वाढत आहे. त्यामुळे दुधाची मागणी वाढत आहे. विशेषत: देशी गायीच्या दुधाकडे कल वाढत आहे. या दुधात रोगप्रतिकारशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवणारी तत्त्वे आहेत. कर्करोगापासूनही बचाव करण्याची ताकद आणि पचनास हलके असल्याने या दुधाला अधिक मागणी आहे. त्यामुळे जादा भाव देऊ नही ते खरेदी केले जात असल्याचे दिसून येते.गायीच्या दुधात वसा, ओमेगा, खनिजे, लवण, क्षार हे असते. त्यामुळे ते आरोग्याला फायदेशीर असते. या दुधामुळे हिंसकवृत्ती कमी होण्यासही मदत होते. देशी गायींची संख्या कमी झाल्याने हे दूध कमी उपलब्ध असते. गोशाला व आध्यात्मिक गुरूंकडून देशी गायीच्या दुधाबाबत जागृती केली जात आहे.
डोंबिवलीनजीक प्रशांत कुटे यांच्या गोशाला प्रकल्पात देशी गायींचे पालनपोषण केले जाते. या गोशालेतून १५० लोक ८० ते १२० रुपये भावाने देशी गायीचे दूध घेत आहेत. भारतीय पशुगणनेनुसार १९ कोटी गायी आहेत. त्यापैकी केवळ नऊ कोटी गायी या देशी आहेत. पिशवीतील बॅ्रण्डेड दूध हे जर्सी गायीचे असते. तसेच कंपन्या या दुधातील सर्व सत्त्व काढून घेतात. त्यामुळे त्यात पोषकतत्त्वेच उरत नाहीत. त्यामुळे तबेल्यातून मिळणाऱ्या दुधाला अधिक मागणी आहे.
कल्याणच्या दूधनाक्यावर व्यवसाय करणारे दूधविक्रेते अस्फी कर्ते म्हणाले की, दूधनाक्यावर दररोज तीसपेक्षा जास्त दूधविक्रेते असतात. दिवसाला २५ हजार लीटरपेक्षा जास्त दुधाची विक्री केली जाते. ताज्या दुधाच्या खुल्या विक्रीत एक लीटरला ६० ते ६५ रुपये भाव आहे. हा भाव ब्रॅण्डेड कंपनीच्या दुधाच्या पिशवीपेक्षा जास्त आहे. सणाच्या दिवसांत दुधाला जास्त मागणी असते. तेव्हा भावही दहा ते पाच रुपयांनी वाढतात. आता रमजान ईद आहे. ईदच्या आदल्यादिवशी क्षीरखुर्मा तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात दूध खरेदी केले जाते. हलवायाच्या व्यवसायासाठी म्हशीच्या दुधाची खुल्या बाजारातून खरेदी केली जाते. हे दूध घट्ट असल्याने ते मिठाईसाठी उपयुक्त असते.
शेळीचे दूध महागडे : शेळीचे दूध हे गायीच्या दुधापेक्षाही जास्त महाग आहे. ग्रामीण भागातून दूध संकलित केले जाते. त्याठिकाणी ५०० ते ७०० रुपये लीटर भावाने दूध विकले जाते. शेळीचे दूध शक्तिवर्धक आहे. त्याचबरोबर शेळीच्या दुधामुळे क्षयरोगाची लागण होत नाही. क्षयरोग दूर करण्यास शेळीचे दूध उपयुक्त ठरत असल्याने त्याला मागणीही जास्त मिळत आहे.