वासिंद : वासिंद येथे असलेल्या जेएसडब्ल्यू (जिंदाल) कंपनीच्या कलर प्लांटविरोधात तसेच स्थानिकांना रोजगारांत प्राधान्य मिळावे, यासाठी ग्रामपंचायत सदस्या प्रेरणा गायकवाड यांनी कंपनीच्या मुख्य गेटसमोरील जागेत साेमवारपासून उपोषण सुरू केले आहे. याबाबत त्यांनी शहापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे इशारा दिला होता.
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत स्थानिक भूमिपुत्रांना राेजगार देण्याबाबत ठराव केला हाेता़. या ठरावाला कंपनी व्यवस्थापनाने केराची टाेपल दाखवली़ तसेच लेखी तक्रार करूनही कंपनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आराेप गायकवाड यांनी केला आहे. उपोषणस्थळी दुपारपर्यंत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फारूख दळवी, प्रदेश सचिव बाळकृष्ण गायकवाड, ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, पँथर नेते तथा उत्तर-मध्य मुंबई जिल्हा सरचिटणीस किसन रोकडे, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव काठोळे, ज्योती भालेराव यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने भेट दिल्याचे रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.