लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात जांभळी नाक्यावरील तब्बल ३५० होलसेल भाजी विक्रेत्यांनी शनिवार पासून बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामुळे शनिवारी या मार्केटमध्ये शुकशुकाट पसरल्याचे दिसून आले. सकाळ पासून येथील मंडईत भाजी घेण्यासाठी येणाºया ग्राहकांना खाली हाताने पुन्हा जावे लागल्याचे दिसून आले.
ठाण्यातील जांभळी नाका येथे छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता संघ आणि जिजामाता फळ भाजी सेवा संघ आहेत. त्यांचे ३५० च्या आसपास स्टॉल आहेत. मागील ४५ ते ५० वर्षापासून भाजी विक्रेते व्यवसाय करीत आहेत. मात्र मागील काही महिन्यापासून किंबहुना वर्षभरापासून याच भागातील रस्त्यांवर अनाधिकृतपणे बसणाºया फेरीवाल्यांचा त्रास आता या भाजी विक्रेत्यांना होऊ लागला आहे.
कोरोनाच्या काळात काही भाजी विक्रेत्यांनी तसेच फेरीवाल्यांना हलविण्यात आले होते. परंतु मागील काही महिन्यात येथील अनाधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढत चालली आहे. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जांभळी नाका ते स्टेशन रोड हा बाजारपेठेतील रस्ता वाहतुकीसाठी असेल त्यादृष्टीने रुंदीकरण केले होते. मात्र आजच्या घडीला पहाटे साडेतीन ते अगदी सकाळी १० वाजेपर्यंत येथे शेकडो अनाधिकृत फेरीवाले बसलेले असतात.
या फेरीवाल्यांच्या विरोधात पालिका प्रशासन, स्थानिक पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे देखील येथील अधिकृत भाजी विक्रेता संघाच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्यापही त्यावर कारवाई झाली नसल्याने अखेर शनिवारी सकाळ पासून येथील भाजी विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असे येथील भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे.
दरम्यान शनिवारी सकाळ पासून येथील रस्ता मोकळा होता. कुठेही भाजी विक्रेत्यांचा आवाज ऐकू नव्हता. नाही तर मेथी २० रुपये, कोंथीबीर १० रुपये जुडी असे वेगवेगळे आवाज येथे ऐकू येत होते. ते शनिवारी पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. तर काही ठाणेकर हे आजही याच मंडईतील भाजी विकत असल्याने त्यांची आज घोर निराशा झाल्याचे दिसून आले. अनेक महिला दूरवरुन येथे भाजी घेण्यासाठी आले असता, सर्वच दुकाने त्यांना बंद दिसत असल्याने त्यांनी खाली हात जावे लागल्याचे दिसून आले.
येथील अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी आणि आम्हाला हक्काचा व्यवसाय करता यावा याच उद्देशाने हा बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही. (जय चोंढकर - उपाध्यक्ष, छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता सेवा संघ)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"