ठाणो : जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २१ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जात आहेत. जिल्ह्यासह राज्यभर नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अराजपत्रित अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचारी या बेमुदत संपात सहभाग घेत आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांनी या बेमुदत संपाचा इशारा देऊन प्रशासनाला धारेवर धरले आहे. शासनाकडे मागील चार वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागणी प्राप्त करून घेण्यासाठी या राज्यस्तरीय बेमुदत संपाचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या संपाद्वारे कर्मचाऱ्यांकडून सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित कराव्यात, पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणे. रिक्त पदे तत्काळ भरणे. कोरोनामुळे मयत झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ ५० लाखांची मदत देणे व कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेणे आदी मागण्या या कर्मचाऱ्यांनी लावून धरल्या आहेत.