- स्नेहा पावसकर ठाणे : कोरोनामुळे यंदा सर्वच सण-उत्सव रद्द होत असताना शनिवारी होणारा भारताचा स्वातंत्र्य दिनाचा उत्सवही याला अपवाद नाही. शासकीय कार्यालयांसह शाळा-महाविद्यालयांत प्रत्यक्षपणे केवळ मोजक्या माणसांमध्ये ध्वजारोहण होणार असले, तरी शहरासह जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांसाठी झेंडावंदनाचा लाइव्ह कार्यक्रम आयोजिलेला आहे. विशेष म्हणजे मान्यवरांच्या भाषणांबरोबरच अनेक विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमही आपापल्या घरूनच आॅनलाइन सादर होणार आहेत.दरवर्षी १५ आॅगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व त्यानंतर अनेकविध कार्यक्रम होतात. शाळा-महाविद्यालयांत तर याचा उत्साह अधिक असतो. ध्वजारोहणाबरोबर विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतगायन, नृत्य, सत्कार सोहळे असे कार्यक्रम शाळांमधून रंगतात. मात्र, यंदा कोरोनामुळे गर्दी होईल, असे कोणतेही कार्यक्रम आयोजनावर बंदी आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करत असतानाच स्वातंत्र्य दिनही सर्वांनी साजरा करावा, या उद्देशाने बहुतांश शाळा-महाविद्यालयांनी आॅनलाइन सोहळ्याचा पर्याय शोधला आहे. क्लासेस, अभ्यास ज्याप्रमाणे आॅनलाइन होतात, त्याप्रमाणे स्वातंत्र्य दिनाच्या लाइव्ह कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आॅनलाइन पाहता आणि सहभागी होता येणार आहे. शाळांनी तसे मेसेजेस पालकांना मोबाइलवर पाठवले असून सोबत लिंक जोडली आहे. त्या लिंकवर जॉइन होऊन कार्यक्रमात सहभागी होण्याची सूचना दिलेली आहे.शाळांमध्ये प्रत्यक्ष होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक आणि ठरावीक शिक्षक, संस्थांचे काही पदाधिकारीच सहभागी होणार आहेत. काही शाळांमध्ये छात्रसेनेच्या मोजक्या विद्यार्थ्यांना परेड संचलनासाठी बोलावले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेतली जाणार आहे.मोजक्या माणसांच्या उपस्थितीत झेंडावंदन सोहळा साजरा करण्याचे शासनाने सर्वांना निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून, मास्क लावून झेंडावंदन होईल. तर, त्यानंतरचे उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रम, गीतगायन बहुतांश शाळा आॅनलाइन पद्धतीने करणार आहेत.- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा परिषद, ठाणेदरवर्षी स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी कार्यक्रमांची तयारी शाळेत आठ दिवस आधीपासून होते. मात्र, यंदा शाळा नाही. परंतु, स्वातंत्र्य दिन सोहळा शाळेत होणार आहे व त्याचे कार्यक्रम आॅनलाइन होणार आहेत. त्याची तयारी आम्ही घरी केली. कार्यक्रमांचे सादरीकरणही घरून करणार आहोत.- श्रेया मोरे, विद्यार्थिनीस्वातंत्र्य दिनानिमित्त १० दिवस आधीपासून शाळेत प्रॅक्टिस सुरू असते. प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करण्याचा उत्साह वेगळाच असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे आम्हा मुलांना घरूनच झेंडावंदनाच्या लाइव्ह कार्यक्रमात सहभागी व्हायला सांगितले आहे. पहिल्यांदाच लाइव्ह कार्यक्रम अनुभवता येणार आहे.- दिशा देसाई, विद्यार्थिनीशाळेत अगदीच मोजक्या माणसांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होणार आहे. दहावीतील ठरावीक विद्यार्थ्यांना शाळेत झेंडावंदनासाठी बोलावले आहे. मात्र, उर्वरित सर्वांना काही मुले गावी किंवा इतर कुठे नातेवाइकांकडे गेलेली आहेत, त्यांनाही आॅनलाइनद्वारे तिथूनच या सोहळ्यात सहभागी होण्यास सांगितले आहे. - मानस शिंगोटे, विद्यार्थी
स्वातंत्र्य दिनही यंदा ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 2:07 AM