मीरारोड - मीरा भाईंदर शहरात मंगळवारी स्वातंत्र्य दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात आयुक्त मधुकर पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, उपायुक्त प्रकाश गायकवाड, अविनाश अंबुरे व जयंत बजबळेसह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अप्पर तहसीलदार कार्यालयात अप्पर तहसीलदार निलेश गौंड यांनी ध्वजारोहण केले. नायब तहसीलदार स्मिता गुरव, मंडळ अधिकारी दीपक अहिरे व तलाठी नितीन पिंगळे, अभिजित बोडके, अनिता पाडवी, रमेश फाफाळे आदी उपस्थित होते.
महापालिका मुख्यालयात आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. काशीमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ तर फाटक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, महापालिका आवारातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यांना तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखू व धूम्रपान विरोधात शपथ घेतली. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या २० नवीन कचरा गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर आणि डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे, रवी पवार व कल्पित पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबीत, नगरसचिव वासुदेव शिरवळकर आदी उपस्थित होते .
चौक येथील धारावी किल्ल्यावर जंजिरे धारावी किल्ले जतन समितीचे रोहित सुवर्ण, श्रेयस सावंत आदींनी ध्वजारोहण केले. भाजपाच्या वतीने शहरात दुचाकी रॅली चे आयोजन करण्यात आले होते. विविध गृहनिर्माण संस्था, चाळ कमिट्या, शैक्षणिक संकुले आदी ठिकठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले. विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते.
मीरारोडच्या मयूर जैन यांनी रस्ते सुरक्षेसाठी ७६ हेल्मेट वितरित करत दुचाकी रॅली आयोजित केली होती. शिवार उद्यान येथे गेल्या ७ वर्षां पासून ग्राहकांनी दिलेल्या जुन्या हेल्मेटचे नूतनीकरण करून त्याचे मोफत वाटप करत असल्याचे जैन म्हणाले.