मीरा रोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयात आज स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त दिलीप ढोले , उपमहापौर हसमुख गेलोत, सभागृहनेता प्रशांत दळवी, परिवहन सभापती दिलीप जैन आदींसह बहुतांश नगरसेवक अधिकाऱ्यांनी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले. गर्दी करून सोशल डिस्टनसिंग पाळले गेले नाहीच, पण ही मंडळी मास्क न लावताच फोटोसेशन करण्यात दंगल झाली होती. तर अनेक जण मास्क न लावताच बिनधास्तपणे वावरत होते.
आमदार गीता जैन यांच्यासह अन्य राजकारणी, नगरसेवक आदी मास्क न लावताच शहरातील अन्य कार्यक्रमात वावरत होते. एरवी सर्वसामान्य नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे उपदेश देणारी, तसेच मास्क नसल्यास कारवाईचे आदेश देणारी हे राजकीय व प्रशासकीय मंडळी महापालिका मुख्यालयातच विना मास्क मिरवत असल्याने, आता त्यांच्यावर कारवाई होणार का? अशी चर्चा सुरू आहे.