ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांनी सात लाख ३८ हजार ६१८ मते घेऊन विजय मिळवला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांनी तीन लाख २८ हजार ८८ मते घेतली. पण उर्वरित २१ अपक्ष उमेदवारांची या निवडणुकीत अनामत रक्कम जप्त झाली. या उमेदवारांना ‘नोटा’च्या २० हजार ४२६ या मतदानापेक्षाही कमी मतदान झाले आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवारांमधील एकही उमेदवार पसंत नसल्यास मतदारास ‘नोटा’ हे बटन दाबून आपली नापसंती दर्शवता येते. यानुसार ठाणे लोकसभा मतदार संघात २० हजार ४२६ मतदारांनी या निवडणुकीतील २३ उमेदवारांना पसंती दिली नाही. या नापसंती दर्शवलेल्या मतदारांपेक्षा कमी मतदान अपक्ष उमेदवारांना झाल्याचे गुरुवारी पार पडलेल्या मतमोजणीत उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर या अपक्ष उमेदवारांना स्वत:ची अनामत रक्कमही राखता आली नाही. त्यांच्या अनामत रकमेचे चार लाख ६२ हजार ५०० रूपये निवडणूक आयोगाकडे आता जमा झाले आहेत.
ठाणे जिल्हा प्रशासनाने निवडणूक काळात राबविलेल्या विविध जनजागृती मोहिमेमुळे मतदारांत मतदान करण्याचा जसा उत्साह वाढत आहे, तसा तो ‘नोटा’ या पर्यायाबाबतही वाढत आहे.नोटाची मते वाढल्याने यापुढे राजकीय पक्षांनी चांगला सुशिक्षित व साक्षर उमेदवार देण्याची गरज निर्माण झाली आहे.नोटाचा वापरया मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत २६ उमेदवारांना तर यावेळी २३ उमेदवारांना नापसंती.