उल्हासनगर : शहराच्या राजकारणात स्थानिक साई पक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका वठविली असून, पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या अध्यक्षा नगरसेवक आशा इदनानी यांनी दिली. साई पक्षाचे गटनेता गजानन शेळके हे भाजप पक्षासोबत नसल्याचे स्पष्ट केले.
उल्हासनगरात स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीवरून भाजप-शिवसेना आमनेसामने आले. भाजपने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, रिपाइं व साई पक्ष सोबत असल्याचे सांगितले. याला साई पक्षाच्या अध्यक्षा व नगरसेवक आशा इदनानी यांनी आक्षेप घेतला असून, साई पक्षाचे शहरात स्वतंत्र अस्तित्व असल्याचे सांगितले. साई पक्षाने यापूर्वी राजकीय महत्त्वपूर्ण भूमिका वठविली असून, पक्षाला दोन वेळा महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदाचा मान मिळाला आहे. गेल्या महापौर निवडणुकीदरम्यान पक्षाचे १२ पैकी १० नगरसेवक भाजपमध्ये समाविष्ट झाले. साई पक्षाच्या नगरसेवकांमुळे भाजपची संख्या ३२ वरून ४२ झाली. महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे आशा इदनानी यांनी सांगितले.
साई पक्षाच्या सर्वेसर्वा आशा इदनानी यांच्या भूमिकेमुळे भाजपला धक्का बसला. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत साई पक्ष यापूर्वीप्रमाणे महत्त्वपूर्ण भूमिका वठविणार असून, साई पक्षाच्या पाठिंब्याशिवाय कोणत्याही पक्षाची सत्ता महापालिकेत येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे गजानन शेळके महापालिका गटनेते असल्याचे त्या म्हणाल्या.