मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पुण्यातील बीआरटीएस प्रकल्पाच्या धर्तीवर कल्याण ते शीळफाटा मार्गावर बससाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचा विचार कल्याण-डोंबिवली पालिका करत आहे. असा स्वतंत्र मार्ग तयार करणे कितपत शक्य आहे, याचे सर्वेक्षण करण्याची तयारी सीआयआरटीने (सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सफोर्ट) दर्शविली आहे. त्याला ४० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचा प्रस्ताव प्रशासनाने परिवहनला दिला आहे. त्यावर ते काय निर्णय घेतात यानुसारच हा स्वतंत्र मार्ग बांधायचा की नाही, ते ठरणार आहे. कल्याणहून नवी मुंबईला जाताना शीळफाट्यापर्यंतचा प्रवास त्रासदायक होतो. त्या मार्गावर जसजशी बांधकामे होत गेली, तशी तेथील कोंडीही वाढत गेली आहे. या मार्गावर इतर वाहनांपेक्षा सार्वजनिक बस वाहतूकीला चांगला प्रतिसाद आहे. मात्र स्वतंत्र मार्ग नसल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी पुण्याच्या धर्तीवर बीएरटीएस-बस रॅपिड ट्रान्झिट स्किम प्रकल्प तयार करण्याचा कल्याण-डोंबिवली महापालिकेचा प्रस्ताव आहे. हा मार्ग कल्याण ते शीळफाटादरम्यान बससाठी असेल आणि तो स्वतंत्र असेल. त्यामुळे कल्याण ते शीळफाटा हे अंतर लवकर कापता येईल. भिवंडी-कल्याण-शीळ हा २१ किलोमीटरचा मार्ग रस्ते विकास महामंडळाने विकसित केला आहे. त्याचा काही भाग हा कल्याण शहरातून जातो. त्यावर कल्याणचा शिवाजी चौक, पत्रीपूल, सूचकनाका, नेतीवली चौक, मानपाडा, लोढा हेवन येथे नेहमी वाहतूक कोंडी होते. रस्ते विकास महामंडळाने हा रस्ता खाजगी कंत्राटी कंपनीच्या माध्यमातून विकसित केला असला तरी या रस्त्यावर प्रवासी वाहतुकीचा भार सगळ््यात जास्त आहे. या रस्त्यावरूनच उरणच्या, खास करून जवाहरलाल नेहरू बंदराच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक होते. मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक मार्गांना जोडणारा मार्ग म्हणूनही त्याला महत्त्व आहे. दुचाकी, रिक्षा, खाजगी बसेस, खाजगी चारचाकी वाहने, सहा आसनी रिक्षा, खाजगी टॅक्सीसेवा अशी विविध प्रकारची वाहने धावत असल्याने वाहतुकीची गती मंदावते. शिवाय केडीएमसी, नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या बस येथून धावतात. एसटीच्या बसेसने दररोज लाखो प्रवासी नवी मुंबईकडे जातात. विविध माहिती-तंत्रज्ञानाच्या कंपन्या, रासायनिक कारखाने, येथे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी स्वस्त प्रवासाचे वाहन सार्वजनिक बससेवा आहे. पण यासाठी वेगळा मार्ग नाही. तसा तो विकसित केल्यास इतर वाहतुकीतून बससेवा वेगळी होईल आणि स्वतंत्र मार्गिकेमुळे बसच्या गतीत आणि फेऱ्यांतही वाढ होईल, असा अंदाज आहे.अमृतअंतर्गत प्रस्ताव : केंद्र सरकारच्या अमृत विकास योजनेअंतर्गत महापालिकेने पाणीपुरवठा, भुयारी गटार योजनेचे प्रस्ताव तयार करुन ते राज्य व केंद्र सरकारकडे पाठविले. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सुधारणेसाठी अमृत अंतर्गत बीआरटीएस योजना राबविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिली. बस वाढविणे शक्य : कल्याण ते शीळफाटा पर्यंत स्वतंत्र वेगळा मार्ग केवळ सार्वजनिक बस वाहतुकीसाठी विकसित केल्यास या मार्गावर जादा बस चालविणे, वाढविणेही शक्य होईल. बीआरटीएस योजनेला केंद्राकडून निधी मिळतो. केंद्राच्याच प्रकल्पातून पालिका परिवहन ताफ्यात आणखी बस दाखल होणार आहेत. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास कल्याण ते नवी मुंबई मार्गावर अधिक बस चालविणे शक्य होईल. ग्रोथ आणि बिझनेस सेंटरला पूरक कल्याण-शीळ रोडवर कोन गाव ते शीळफाटादरम्यान एलिव्हेटेट रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्यालगतच २७ गावे असून त्यातील १० गावांकरीता एक हजार ८९ कोटींच्या खर्चाचे कल्याण ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे. तेथे एक लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कल्याण- शीळ रोडलगत कोळेगावात सेंट्रल बिझनेस सेंटर उभारले जाणार आहे. कल्याण- डोंबिवली रिंग रोडही ८०० कोटींच्या खर्चाचा आहे.
कल्याण ते शीळफाटादरम्यान बससाठी होणार स्वतंत्र रस्ता
By admin | Published: May 24, 2017 1:12 AM