ठाणे : महिलांना सुलभरित्या कोरोना प्रतिबंधक लस घेता यावी, यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या विशेष लसीकरण सत्राचे उद्घाटन सोमवारी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते तसेच महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ठामपा शाळा क्र. १२ टेंभीनाका येथे करण्यात आले.
यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक सुधीर कोकाटे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव आदी उपस्थित होते. अनेक महिला नोकरीनिमित्ताने तसेच मोलमजुरीच्या कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर वेळेत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे ठाणे शहरात झालेल्या एकूण लसीकरणाच्या आकडेवारीत महिलांची आकडेवारी कमी आहे. महिलांना त्यांच्या वेळेनुसार लस घेता येण्यासाठी ठाण्यातील टेंभीनाका येथील शाळा क्र. १२मध्ये दिवसभर दोन सत्रात सकाळी १० ते रात्री १० या वेळेत महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केल्याचे महापौरांनी सांगितले. इतर ठिकाणीसुद्धा दोन सत्रात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. गर्भवती महिलांना केंद्रावर प्राधान्याने लस दिली जात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १२ लाखांचा लसीकरणाचा टप्पा पार करीत आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक, बेघरांसाठी, तृतीयपंथी नागरिकांसाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवून लसीकरण केले.