लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना, १३ ते १५ ऑगस्टपर्यंत घराघरांवर तिरंगा फडकविण्यासाठी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने काल्हेर येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे शेकडो नागरिकांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात असून, ठिकठिकाणी राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे वितरण केले. प्रत्येक घराबरोबरच महत्वाच्या इमारती, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींची कार्यालये आदी ठिकाणी तिरंगा फडकविला जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात तिरंगा वाटप कार्यक्रमाला सुरूवात झाली.जिल्हा परिषदेच्या भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शाळेत तिरंगा ध्वजाचे आज वितरण करण्यात आले. यावेळी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, प्रकल्प संचालिका छाया शिसोदे, तहसीलदार अधिक पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंत पाटील, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे आदींची उपस्थिती होती.
प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाविषयी आत्मियता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. तर देशप्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने मोहिमेत हिरीरीने सहभागी व्हावे, असे आवाहन बोर्हाडे यांनी केले. स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याबरोबरच राष्ट्राभिमान जागविण्यासाठी घराघरावर झेंडा फडकवावा, असे आवाहन सुभाष पवार यांच्याकडून करण्यात आले.