मुंबई : चीनवर वचक ठेवण्यासाठी भारताला अन्य मित्र देशांची साखळी तयार करण्याचीसुद्धा आवश्यकता आहे. भारताने आशियातील जपान, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम या देशांशी सामरिक संबंध वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न करावयास हवेत. हे देश एकमेकांना तुल्यबळ असल्याने कोणत्याही एका देशाच्या नेतृत्वाऐवजी सामूहिक नेतृत्वाने चीनच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयोगात भारताने पुढाकार घ्यायला हवा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने ‘भविष्यातील भारत आणि चीन यामधील संबंध’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात मान्यवरांनी विचार व्यक्त केले. या वेळी ले. जनरल अभय कृष्णा (निवृत्त), डॉ. श्रीकांत कोडापल्ली, जयदेव रानडे (आयएफएस), डॉ. बी. आर. दीपक, ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त), स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी सहभाग घेतला.ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी या चर्चासत्रात भूमिका मांडताना सांगितले, सागरी सीमांचा वापर करून चीनचा व्यापार रोखू शकतो, चीनद्वारे फोफावलेला माओवाददेखील आपण देशातून नेस्तनाबूत करू शकतो, सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकद सिद्ध केली पाहिजे. देशाच्या संरक्षणात्मक कार्यात जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी हा प्रयत्न आहे,अंदमान निकोबार हे संरक्षण तळ करण्याचा सावरकर यांचा विचार आज किती महत्त्वाचा ठरतो, हे ध्यानात येते, असे मत रणजीत सावरकर यांनी व्यक्त केले. भारताला स्वत:चे हित जपत असतानाच चीनशी असलेले संबंध सैरभैर होणार नाहीत यासाठी विविधांगी धोरण अंमलात आणावे लागेल, असे मत जयदेव रानडे यांनी व्यक्त केले. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत भारत आणि चीनदरम्यान मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होण्याच्या शक्यता वारंवार पुढे आल्या आहेत. कधी कधी दोन्ही देशांतील सहकार्य आकाराससुद्धा आले आहे; आणि तसे होत असतानाच ते अचानक संपुष्टात आले आहे, असे मत श्रीकांत कोडापल्ली यांनी व्यक्त केले.‘राष्ट्रहित एकमेकांच्या आड येते’सध्याच्या स्थितीत द्विपक्षीय संबंधांबाबत भारत आणि चीनकडे दोन पर्याय आहेत. एक, काही बाबतीत राष्ट्रीय हित एकमेकांच्या आड येत असल्यामुळे एकमेकांशी पूर्ण शत्रुत्व पत्करायचे; किंवा दोन, ज्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आवश्यक व शक्य आहे तिथे परस्परांची साथ द्यायची, मात्र ज्या मुद्द्यांवर राष्ट्रीय हित एकमेकांच्या आड येते आहे तिथे आपापली भूमिका ठाम ठेवायची, असे मत ले. जनरल अभय कृष्णा यांनी व्यक्त केले.
चीनवर नियंत्रण आणण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:56 AM