ठाणे : भारताने अनुकरण किंवा प्रतिबंधापुरते मर्यादित न राहता सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांचा गडकरी रंगायतन येथे शनिवारी अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. माशेलकर बोलत होते. ते म्हणाले की, देव आपल्याला घडवत असतो, असे म्हणतात. परंतु, देव काही माणसे फुरसतीने घडवत असतो. देवाने समेळांना घडवले, तेव्हा त्याच्याकडे फुरसत होती, वेळ होता. खरी मोठी माणसं ही झपाटलेली असतात व समेळांसारखा झपाटलेला मित्र मला मिळाला, याचा अभिमान आहे. १२ मे २०४३ रोजीही आपण इथे भेटू, असे समेळ यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.समेळ यांनी ७५ व्या वर्षाप्रमाणे १०० व्या वर्षीही बोलवावे, ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीची १०० वी आवृत्ती प्रकाशित करावी आणि ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’प्रमाणे ‘मी अशोक समेळ चिरंजीव’ हे पुस्तक यावे, या तीन इच्छा डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, व्यक्ती या निघून जातात; पण संस्था कधीही जात नसतात. समेळ ही एक संस्था आहे आणि संस्था या नेहमीच चिरंजीव राहतात.ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर म्हणाले की, अश्रूंची झाली फुले या नाटकात मी आणि समेळ यांनी एकत्र काम केले आहे. सर्व क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. प्रत्येक जण पंचाहत्तरी पूर्ण करतो, परंतु यशस्वी व्यक्तीचाच अमृत महोत्सव अशा पद्धतीने साजरा होत असतो.समेळ यांच्या लेखणीची जोरदार ताकद आहे. त्यांचे लिखाण अद्भुत, अप्रतिम आहे, अशा शब्दांत राजेंद्र बुटाला यांनी त्यांचे कौतुक केले. जी मैत्री पारदर्शी व निरपेक्ष असते, ती खूप वर्षे टिकते, अशीच माझी आणि समेळ यांची मैत्री असल्याचे अभिनेत्री फय्याज म्हणाल्या.समेळ लिखित ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीवर मालिका, चित्रपट निघाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी त्यांचे लेखन थांबवू नये, असे पंचागकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले. त्यानिमित्ताने त्यांच्या ‘स्वगत’ या आत्मचिंतनाचे व ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. संजय केळकर, डॉ. नरेश शहा, जयेंद्र साळगावकर, उपेंद्र दाते, प्रसाद कांबळी, भूषण तेलंग, अशोक बागवे उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले.
भारताने अनुकरणाऐवजी नावीन्याचा ध्यास घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 6:25 AM