ठाणे : चीनमध्ये ग्राफीक डिझाइनिंगचे प्रशिक्षण घेऊन भारतीय चलनातील बनावट नोटा ब नविणा-या मारी काशी मणी याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराला यापूर्वीच अटक करून त्यांच्याकडून शंभर रुपये दराच्या ६० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.काही रुपयांच्या बदल्यात बनावट नोटा विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवसे यांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने २९ आॅगस्ट रोजी कोपरी येथील आनंद सिनेमागृह भागात सापळा रचून अब्बलगन मुर्तुवर (२८, रा. धारावी, मुंबई) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून १०० रुपये दर्शनी मूल्याच्या ६०० वेगवेगळ्या अनुक्रमांकाच्या ६० हजारांच्या बनावट नोटाही हस्तगत केल्या होत्या. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत या बनावट नोटा त्याचा साथीदार मुंबईच्या पोईसर भागातील रहिवाशी मणी याच्या मदतीने छापल्याचे कबूल केले. त्यानुसार ३१ आॅगस्ट २०१९ रोजी त्यालाही अटक केली. त्यांच्याकडून नोटा छपाईसाठी लागणारे साहित्य तसेच लॅपटॉप, लेझर कलर प्रिंटर, महात्मा गांधीचा वॉटर मार्क बनविलेले कागद, आरबीआय असे छापलेले हिरवी रेडियमची पट्टी असलेले कागद तसेच नोटा बनविण्यासाठी वापरायचा कोरा कागद आणि लॅमिनेशन मशिन आदी सामुग्री हस्तगत केली होती. मणी हा यापूर्वी तामिळनाडूतील चेन्नई येथे प्रिंटिंग प्रेसमध्ये ग्राफीक डिझाईनिंगचे, फोटोशॉप आणि कोरल ड्रॉमध्ये डिझायनिंगचे काम करीत असे. त्याने या संदर्भात चीनमध्ये जाऊन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. याच अनुभवाचा वापर करून त्याने भारतीय चलनाच्या शंभर रुपये मूल्याच्या बनावट नोटा बनविल्याची बाब तपासामध्ये समोर आली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला आणि पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली.
चीनमध्ये ग्राफीक डिझाइनिंगचे प्रशिक्षण घेऊन बनविल्या भारतीय बनावट नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 10:08 PM
कोपरी येथून अटक केलेल्या अब्बलगन मुर्तुवर याच्या माहितीच्या आधारे मारी मणी याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने नुकतीच मुंबईतून अटक केली आहे. त्याने चीनमध्ये ग्राफीक डिझाइनिंगचे प्रशिक्षण घेऊन भारतीय चलनातील शंभर रुपयांच्या बनावट नोटा बनविल्याचे तपासात उघड झाले आहे.
ठळक मुद्देदुस-या साथीदारालाही अटक ६० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत ठाणे गुन्हे शाखेची कारवाई