ठाणे : भारतीय सैनिक जातपात, धर्म, प्रदेश कधीही मानत नाहीत. त्यांचा एकच धर्म राष्ट्रधर्म असतो. एकतेची ताकद हेच भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. हाच संदेश देणारा नऊ भाषेतील देशभक्तीपर गीतांचा सादर केलेला कार्यक्रम हा व्यास क्रिएशन्स्च्या स्तुत्य उपक्रम आदर्शवत आहे, असे मत निवृत्त मेजर सुभाष गावंड यांनी व्यक्त केले. ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त व्यास क्रिएशन्स् आयोजित, स्वरज्ञान निर्मित आणि संदिप वैद्य संचलित वंद्य वंदे मातरम् नऊ भाषा गौरवी भारतवर्षा ह्या देशभक्तीपर निवडक समर गीतांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार संजय केळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वंदे मातरम् हा प्रत्येक भारतीयांचा प्रेरणादायी मंत्र आहे. तो प्रत्येकाने जपला पाहिजे. एकाच वेळी नऊ विविध भाषेतील देशभक्तीपर गीते सादर करणारा हा अभिनव उपक्रम असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. यावेळी आमदार केळकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. संदिप वैद्य संचलित स्वरज्ञानच्या गायिकांनी हिंदी, काश्मिरी, मगधी, गुजराथी, मल्याळम्, कन्नड, कोंकणी, मराठी आणि बंगाली या नऊ भाषांतील देशभक्तीपर गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पितांबरी उद्योग समुह हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. निशिकांत महांकाळ यांनी वाजपेयींच्या गाजलेल्या कवितांच्या सादरीकरणातून काव्यांजली अर्पण केली. यावेळी ठाण्यातील निवडक प्रार्थनास्थळांच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक श्री. वा. नेर्लेकर यांनी आपल्या मनोगतात अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करून व्यास क्रिएशन्सच्या आगामी दिवाळी अंकांच्या योजनेची माहिती दिली. व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सर्वधर्मीय आणि सर्व भाषिकांनी एकत्र येऊन कार्य केले तरच एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील महासत्ता भारत उदयास येण्यास वेळ लागणार नाही, असा आशावाद नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केला. राजेंद्र पाटणकर यांनी निवेदन केले. कार्यक्रमाला ठाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.