ठाणे : मराठी रंगभूमीवर नेहमीच वेगळे वेगळे प्रयोग यशस्वीरीत्या होत असतात. असाच एक प्रयोग तरुण मराठी कलाकारांनी केला आहे तो म्हणजे भारतातील पहिला वहिला दोन अंकी मूकनाट्य “क्लिक”. कुठल्याही संवादाचा वापर न करता, फक्त चेहऱ्यावरील भाव आणि आंगिक अभिनयाच्या जोरावर मूक नाट्य हा कलाप्रकार सादर केला जातो.
येत्या १९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता ठाण्यातल्या डॉ काशिनाथ घाणेकर लघु नाट्यगृहात क्लिक या दोन अंकी मूक नाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. दोन अंकी सांगीतिक मूक नाट्याचा प्रयोग पहिल्यांदा भारतात होतोय. ह्या मूक नाट्याचे लेखन व दिग्दर्शन विपुल काळे याने केलेले आहे. सादर होणार्या नाटकात दोन कथा आहेत. दोन्ही कथा छायाचित्रकारांवर आधारित आहेत. फोटोग्राफि म्हणजे छायाचित्रकारिता कशी छायाचित्रकाराच्या आयुष्यात काय परिणाम करते, त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कसे बदल घडून येतात हे ह्या मूक नाट्यात दाखवण्यात आलेले आहे.
ह्या नाटकात आयुष संजीव, पूर्वा कौशिक, अनिषा सबनीस, अनुष्का गीते, मयुरेश खोले, गौरव कालूष्टे, विपुल काळे असे मराठी मालिका आणि नाटकात झळकणारे चेहरे आहेत ह्याच सोबत प्रतीक्षा फडके, कोमल मयेकर, गौरी कार्लेकर , दीपक राठोड, पार्थ डिकोंडा, सिद्धार्थ आखाडे,केतन मोरे, पूजा, संजना , जीत असे मनोरंजन क्षेत्रात काम करणारे कलाकार देखील आहेत. ह्या नाटकाचे संगीत आदित्य काळे, प्रकाश योजना युगांत पाटील ह्यांनी केलेली आहे. ह्या नाटकाचे निर्मिती प्रमुख म्हणुन प्रफुल्ल गायकवाड जबाबदारी सांभाळत आहे. तरुण कलाकारांवर विश्वास ठेवून ह्या आगळ्यावेगळ्या नाटकाची निर्मिती निखिल काळे ह्यांनी केलेली आहे. या वर्षीच्या १०० व्या नाट्य संमेलनात देखील क्लिक ह्या मूक नाट्याला सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.