ठाणे : ऑनलाइनद्वारे ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. मात्र बनावट वैद्यकीय दाखले, आईवडील, पत्नी आजारी असल्याची आदी कारणे देऊन जिल्हाभरातील ६६ शिक्षकांनी त्यांच्या सोयीनुसार व घराजवळच्या शाळेत बदल्या करून घेतल्याचे उघड झाले आहे. प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या या शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करायचा की, त्यांचे निलंबन करायचे आदी संकेत मिळत आहे.
ऑनलाइन बदल्यांमधील घोळ लोकमतने सातत्याने पाठपुरावा करून उघड केला आहे. त्यास अनुसरून मुंबई उच्च न्यायालयासह विभागीय आयुक्तांनी त्याची दखल घेऊन अन्याय झालेल्या शिक्षकांची बाजू ऐकून त्यांना न्याय दिला. याशिवाय, ज्यांनी सोयीच्या बदलीसाठी बनावट वैद्यकीय दाखल्यांचा वापर केल्याचेदेखील प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले असता त्यानुसार तपासणी केली. तब्बल ६६ प्राथमिक शिक्षकांचा त्यात समावेश आढळून आला. यासंदर्भात शिक्षण समिती सदस्य सुभाष घरत यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्तास दुजोरा देऊन शनिवारी पार पडलेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानमुळे ६६ शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करायचे की, त्यांचे निलंबन करायचे याचा विचार आता जिल्हा परिषद करीत असल्याचे ते म्हणाले.या ६६ शिक्षकांनी बनावट वैद्यकीय दाखल्यांचा वापर करून जवळच्या व सोयीच्या शाळेत बदली करून घेतल्याचे आता उघड झाले आहे. याप्रमाणेच संवर्ग-३ व ४ प्रमाणेच अवघड नसलेली शाळा अवघड क्षेत्रात असल्याची खोटी माहिती देऊन काही शिक्षकांना सोयीच्या शाळांवर प्राधान्याने बदली मिळाली आहे. एवढेच नव्हे तर पतीपत्नींनी एकत्र बदलीसाठी खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे.