अंबरनाथ - ठाणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची आणि विद्यार्थी संख्या जास्त असलेली औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ मध्ये असून या अंबरनाथच्या आयटीआयच्या इमारतीचा नव्याने विकास करण्यासाठी राज्य शासनाने 59 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या इमारतीला मंजुरी दिली आहे.
अंबरनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारतीची काही प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये आणि संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर सातत्याने आग्रही होते. तसेच यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून अंबरनाथ येथील आयटीआय इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
यासाठी ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच याच्या कामाला सुरुवात होणार आहे. अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात कल्याण बदलापूर राज्य मार्गावर अंबरनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)आहे. या ठिकाणी केवळ अंबरनाथच नव्हे तर बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येतात. यामुळे या प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
ठाणे जिल्ह्यातील अत्यंत जुनी संस्था म्हणून अंबरनाथ येथील आयटीआय ओळखले जाते. गेली अनेक वर्ष जुनी इमारत असल्याने या इमारतीची काही प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये तसेच या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी इमारतीची पुनर्बांधणी गेली जाणार आहे.
* अंबरनाथ आयटीआयमध्ये तब्बल बाराशे विद्यार्थी दोन शीट मध्ये प्रशिक्षण घेत आहेत.जिल्ह्यातीलच नव्हे तर पर जिल्ह्यातील विद्यार्थी देखील येतात.
* या ठिकाणी वसतिगृह वगळता इतर सर्व सेक्शन हे पत्र्याच्या शेडचे असल्यामुळे अनेक ठिकाणी त्या शेडला गळती लागली होती. * अगदी स्टेशनच्या परिसरात आयटीआयची मोक्यावरची जागा असल्यामुळे तिथे आता नव्याने इमारत उभारून प्रशस्त प्रशिक्षण केंद्र साकारले जाणार आहे.
''कौशल्य विकास योजनेअंतर्गत नव्या इमारतीसाठी 59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आता इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले जाईल. - डॉ. बालाजी किणीकर, आमदार