ठाणे : वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ही ‘एमआयडीसी’ची पहिली औद्योगिक वसाहत असून एमआयडीसीच्या बारवी धरणातून या वसाहतीला पाणीपुरवठा होतो. मात्र, काही वर्षांपासून पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यामुळे अनेक उद्योगांना घरघर लागली आहे. येथील प्लॉटधारकांना १५ ते २० दिवस, तर काही ठिकाणी २५ दिवसांपेक्षा कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे औद्योगिक वापरासाठीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचीही बोंब आहे. तसेच जे पाणी येते, ते अत्यंत कमी दाबाने येते. याबाबत एमआयडीसी आणि स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी या औद्योगिक वसाहतीची स्थिती झाल्यामुळे अखेर पाण्यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्याचे ठाणे लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष डॉ. अप्पा खांबेटे यांनी सांगितले.
ंवागळे इस्टेट बारवी धरणापासून शेवटचे टोक असल्यामुळे व येथील भौगोलिक स्थिती वेगळी असल्याने मुळातच येथे पाणीपुरवठा आलटूनपालटून होत आहे. त्यातच, चार महापालिका बुस्टर पम्पाद्वारे एमआयडीसीचे जास्तीतजास्त पाणी उचलतात. त्यामुळे वागळे इस्टेटमध्ये पाणी पोहोचतच नाही. तसेच वागळे इस्टेटमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसी लक्ष देत नाही, असाही आरोप संघटनेने केला आहे. एमआयडीसीने काही वर्षांपूर्वी वागळे इस्टेटला माहिती तंत्रज्ञान पार्क जाहीर केले. सध्या जवळजवळ ५७ पार्क आहेत. स्थानिक कंपन्या ज्यांच्याकडे अर्धा ते एक इंच जोडणी आहे, त्या सर्व प्लॉटधारकांना टँकरशिवाय पर्याय नाही; मात्र तेही मिळणे अनेकवेळा दुरापास्त होते. तसेच याविषयी संघटनेने एमआयडीसीला, उद्योगमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्थानिक अभियंत्यांना पत्राद्वारे एसएमएसद्वारे तसेच टिष्ट्वटरच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री तसेच नुकतीच संघटनेने पंतप्रधान कार्यालयासही पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.