भिवंडी (दि.२७) : भिवंडीत ओमायक्रोनचा पहिला रुग्ण आढळला आहे. शहरातील गैबीनगर परिसरात कतार येथून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी केली असता सदर व्यक्तीस ओमायक्रोनची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. भिवंडीसारख्या गजबजलेल्या शहरात ओमायक्रोनचा रुग्ण आढळण्याने मनपा प्रशासन सतर्क झाले आहे.
भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रात सध्या कोरोना आटोक्यात असला तरी नविन विषाणु ओमायक्रॉन या विषाणूचे रुग्ण राज्यात ठिकठिकाणी आढळून येत आहेत. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भिवंडीत आलेल्या व्यक्तींना शोधून त्यांची कोचिड चाचणी मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या चाचणीत कतार येथून गैबिनगर या परिसरात आलेल्या नागरिकांची कोरोना तसेच ओमायक्रोन संदर्भातील चाचणी करण्यात आली असता सदर नागरिकास ओमायक्रोनची बाधा झाली असल्याची माहिती भिवंडी मनपा प्रशासनाने सोमवारी दिली आहे. विशेष म्हणजे या रुग्णाने कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले असून सध्या या बाधित रुग्णास कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत असा खुलासा देखील मनपा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, या एका रुग्णाच्या माध्यमातून भिवंडीत ओमायक्रोनचा शिरकाव झाला असून नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करावे व ज्यांनी अद्याप कोविड लस घेतली नाही अशा नागरिकांनी त्यांनी आपला कोविड पासून बचाव करण्यासाठी कोविड लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनदेखील मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.