लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या आरोग्य प्रशासनासह नागरिकांनी कोरोनाच्या दोन लाटांचा सामना केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. त्यात साथरोगांनी डोके वर काढल्यास तिसऱ्या लाटेची दाहकता वाढू शकते. मात्र, जूनपासून आतापर्यंत साथरोगाच्या रुग्णांची संख्या पाहता प्रत्यक्षात मनपा हद्दीतील लोकसंख्या आणि आढळलेले साथरोगाचे रुग्ण यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मनपाच्या साथरोग नियंत्रण विभागाकडून साथरोग नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जून २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट शिगेला पोहोचली असताना साथीच्या रुग्णांच्या आकडेवारीचा पत्ताच नव्हता. त्यावेळी आरोग्य यंत्रणा पहिल्या लाटेशी सामना करण्यात व्यस्त होती. त्यानंतर दुसरी लाट फेब्रुवारी ते एप्रिल २०२१ दरम्यान आली होती. कोरोनाचे पहिले लक्षण हे ताप आहे. ताप आला असताना कोरोना चाचणी केल्यास ती चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते. मात्र, यंदाच्या जूनपासून आतापर्यंत आढळून आलेल्या तापाच्या रुग्णांच्या कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ताप म्हणजे कोरोनाच असे गृहीत चुकीचे ठरत आहे. काविळी, मलेरिया, टायफॉइड आणि डेंग्यूचे रुग्ण जून ते आतापर्यंत आढळून आलेले आहेत. या आजारांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याकडून डेंग्यू आणि मलेरियाचे सर्वेक्षण सुरू आहे.
-------------------
रोज ५८ रुग्ण
जूनपासून आतापर्यंत केडीएमसी हद्दीत पाच हजार ९७७ तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हायरल फीव्हर आहे. दिवसाला ५८ तापाचे रुग्ण आढळून आले आहेत.
---
मुलांचे प्रमाण जास्त नाही
तापाचे प्रमाण मुलांमध्ये जास्त नाही. ताप येतो; पण तो व्हायरल फीव्हर आहे. ताप आलेल्या मुलांची चाचणी केल्यावर त्यांच्यामध्ये कोरोना आढळून आलेला नाही. ज्या मुलांच्या पालकांना कोरोना झालेला आहे, त्याच मुलांना पालकांकडून कोरोनाची लागण झालेली आहे.
--
केडीएमसी हद्दीत व्हायरल फीव्हर आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आहे. साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजीची आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वेक्षण मनपाच्या प्रत्येक प्रभागात केले जात आहे.
- डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग नियंत्रण, वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी
---
काय आहेत लक्षणे?
डेंग्यू : खूप ताप येतो. शरीरात त्राण राहत नाही. ताप उतरत नाही.
कावीळ : भूक लागत नाही. अन्न जात नाही. तसेच शरीर पिवळे पडते. परंतु, काही काविळीच्या आजारात शरीर पिवळे पडत नाही, तर पांढरे पडते.
चिकन गुन्या : हातापायाची शक्ती जाते. खूप अशक्तपणा वाटतो. शरीरात त्राण राहत नाही. सांधे आखडले जातात.
----------------------------------------
१ जून ते १९ सप्टेंबर २०२१ दरम्यान आढळून आलेले रुग्ण
ताप रुग्ण- ५,९७७
कावीळ- ६१
टायफॉइड- ५१
मलेरिया- ४५
गॅस्ट्रो- ३०
डेंग्यू- १५
लेप्टो- ०९
स्वाइन फ्लू-०२
चिकन गुन्या-०१
कॉलरा-००
---------------