ठाणे : जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे या पिकाला यंदाही चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. चक्री भुंगा ही कीड सध्याच्या पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाला वरपर्यंत अन्नपुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो. त्यावर शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला कृषीतज्ज्ञांकडून दिला जात आहे.
चक्री भुंग्याची अळी देठ, फांदी आणि खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पूर्ण झाड वाळून जाते व वेळेवर उपाययोजना न केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. हा प्रादुर्भाव आढळून आल्यास वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. त्यामुळे प्रादुर्भाव झालेली झाडे, पाने, फांद्या यांच्यातील कीड नष्ट होणे गरजेचे आहे. या पद्धतीचा १५ दिवसांतून दोनदा अवलंब केला तर चक्री भुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होईल, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये, यासाठी सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या ३०-३५ दिवसांनंतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन ५० टक्के, ३० मिली प्रति १० लिटर अथवा थायक्लोप्रीड २१.७. एस.सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल १८.५ एस.सी. ३ मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के आणि लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के, झेडसी २.५ ग्रॅ. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारण्याचा सल्ला विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक विकास पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.