खोडाळा : घरगुती वापरातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींत भरमसाट वाढ झाल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब बेजार झाले असून, कोरोना महामारीच्या संकटात जीवन जगणे असह्य झाले आहे. एकीकडे घरगुती गॅस दरवाढ होत असताना आता तेल, डाळींचे भाव गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने यापुढचे दिवस काढायचे कसे असा प्रश्न सामान्यांसमोर आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असल्याचे चित्र असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यात इंधन दरवाढीचा फटकाही नागरिकांना बसत आहे. गेल्या दोन महिन्यांत करडई, सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीनसह पामतेलाचे भाव लीटरमागे तब्बल ३० ते ४० रुपयांनी वाढले आहेत. मोहरी व तीळ तेलाचे दर तुलनेत स्थिर असले, तरी या तेलाचे भाव मात्र चढेच आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये सूर्यफुल तेलाचा दर ९८ रुपये प्रति लीटर होता.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ११० रुपये दर होता, तर जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात १३४ दर होता. सध्या एक लीटर सूर्यफुल तेलासाठी ग्राहकांना १५० रुपये मोजावे लागत आहे. दोनच महिन्यांत सूर्यफुल लीटरमागे १६ रुपयांनी महागले आहे. हीच अवस्था शेंगदाणा तेलाची आहे. दोन महिन्यांपूर्वी १५० रुपये प्रति लीटर या भावाने मिळणाऱ्या शेंगदाणा खाद्यतेलासाठी सध्या १६४ रुपये मोजावे लागत आहेत, तर १७० रुपये प्रति लीटर या दराने मिळणा-या करडई तेलाचा भाव हा चार रुपयांनी वधारला असून, सध्या १७४ रुपये प्रति लीटर दर आहे.
महागाईच्या भरमसाट वाढीमुळे बजेट कोलमडले आहे. भाजी, किराणा, गॅस सिलिंडर यासारख्या वाढणाऱ्या गोष्टींना तोंड देताना नाकीनऊ येत आहे. तेलाचे दर असेच वाढत राहिले, तर सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा सवाल निर्माण होत आहे. - मेघा काशीद, गृहिणी