- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : सर्वच कच्च्या मालावर लागू झालेला जीएसटी तसेच कारागिरांचा वाढलेला पगार, यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. सध्या कारखान्यांत मूर्तींना रंग देण्याचे काम सुरू असून गणेशभक्तदेखील मूर्तींच्या बुकिंगला मूर्तिकारांकडे येत असल्याचे पाहायला मिळत आहे.सप्टेंबर महिन्यात श्री गणरायाचे आगमन होणार आहे. कारखान्यांत मूर्तिकाम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन महिने राहिल्यामुळे मूर्तींना रंग देण्याचे काम सुरू आहे. मूर्तिकार आणि त्यांच्याकडे कामाला असणारे कारागीर हे रंगकामात गुंतले आहेत. परंतु, यंदा सर्वच कच्च्या मालावर लागू झालेल्या जीएसटीची झळ गणेशमूर्तींना बसली आहे. याआधी डायमंड आणि ठरावीक रंगांवर जीएसटी लागू होता.परंतु, यंदा माती, पीओपी, सर्वच रंग यांवर तो लागू झाल्याने मूर्तींचे दर वाढले आहेत, अशी माहिती मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.>यामुळे वाढली किंमतगेल्या वर्षी १४०० ते २५००० रुपयांना विकल्या गेलेल्या मूर्तींचे दर यंदा १५०० ते २८,००० रुपये आहेत. १५० रुपये दराने मिळणारी मातीची गोणी जीएसटीमुळे १७५ रुपये दराने, तर २०० रुपयांचा रंग हा जीएसटीमुळे २३० रुपयांना मिळत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. ज्यांना मूर्तिकाम येते, अशाच कारागिरांना कामावर ठेवू शकतो. परंतु, आता तेदेखील कमी होत असल्याने जे आहेत, त्यांना हाताशी घेऊन काम करावे लागते. मात्र, त्यांनीही आपला पगार वाढवल्यामुळे मूर्तींच्या दरात वाढ करावी लागली असल्याचे मूर्तिकार प्रवीण पातकर यांनी सांगितले.कारागिरांचा पगार वाढत असल्यामुळे मूर्ती कमी केल्या असून आमचे संपूर्ण कुटुंब या कामात गुंतले असल्याचे पातकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले. गणेशोत्सवाला दोन महिने असल्याने मूर्तींच्या बुकिंगला हळूहळू सुरुवात झाली आहे. श्रावण महिना सुरू झाला की, बुकिंगलादेखील जोर येईल तसेच मूर्तींच्या कामालादेखील वेग येईल.
बाप्पांच्या मूर्तींवर जीएसटीमुळे आले महागाईचे विघ्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:47 AM