ठाणे : आतापर्यंत दोन कोटी, चार कोटी आणि १३ कोटी या तीन टप्प्यांत वृक्षलागवड मोहिमा पार पडल्या आहेत. यातील किती झाडे जिवंत आहेत, याविषयीची माहिती ३१ जानेवारीपर्यंत सर्व विभागांनी वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आदेश वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी घेतलेल्या वृक्षलागवडीच्या कोकण विभागीय आढावा बैठकीत दिले.५० कोटी वृक्षलागवडीच्या पूर्वतयारी कार्यक्रमप्रसंगी येथील नियोजन भवनमध्ये कोकण विभागीय आढावा बैठक झाली. पुढील वर्षी म्हणजे २०१९ ला ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जनतेतून जास्तीतजास्त सहभाग कसा मिळेल, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही खारगे यांनी दिल्या. यादृष्टीने लोकशिक्षण व प्रबोधन होणे गरजेचे आहे. यावरही त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. वृक्षलागवडीचे नियोजन आणि तयारीचा आढावा घेतेवेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील तसेच सर्व जिल्हाधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) उमेश अग्रवाल तसेच वनविभागाचे अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यानंतर, आता ३३ कोटी वृक्षलागवडीसाठी भूमी बँक तयार करणे, मार्च २०१९ पर्यंत रोपांसाठी खत, माती भरून खड्डे तयार करणे, नद्यांच्या किनाºयांपासून एक किमी अंतरावर वन, शासकीय, खासगी जमिनींवर वृक्षारोपण करणे, खासगी क्षेत्रावर फळ, बांबू लागवडीस प्रोत्साहन देणे, सामाजिक वृक्षलागवडीचा सहभाग मोठा असावा, यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यावसायिक यांच्याशी करार करून त्यांना सहभागी करून घेणे, अशा स्वरूपाच्या सूचनाही त्यांनी दिल्या.रानमळा धर्तीवर वृक्षलागवड, कन्या वनसमृद्धी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळझाडे योजना, नारेगा अशा विविध योजनांतील वृक्षलागवडीस गती द्यावी. कृषी विभागानेदेखील शेतकºयांना फळझाडे लागवडीसाठी उत्तेजन द्यावे, असे सांगून खारगे म्हणाले की, एक कोटी व्यक्तींची हरितसेना उभारण्यात येत असून त्यासाठीही २८ फेब्रुवारीपर्यंत जास्तीतजास्त नोंदणी करावी.मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली या पालिकांनी त्यांच्या पाणीपुरवठास्थळांवर त्रिपक्षीय करार करून मोठ्या प्रमाणावर रोपे लावावीत तसेच कांदळवनलागवडही त्यात्या क्षेत्रात मोठ्या संख्येने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वृक्षारोपणातील जिवंत झाडांची माहिती द्या! वनविभागाच्या सचिवांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 2:58 AM