ठाणे : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दंडमाफीचा प्रस्ताव गेला असता तो चर्चेला येण्याआधीच एका मंत्र्याने ही माहिती बाहेर फोडली, असा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाने त्यास न जुमानता प्रस्ताव मंजूर केला. यामुळे हा मंत्री कोण, याबाबत चर्चा सुरू आहे.
विहंग गार्डनमध्ये एक इंच जरी अनधिकृत बांधकाम असल्याचे सिद्ध केले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे स्पष्ट केले. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी सूडबुद्धीने या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्ट्या बेकायदा ठरविले होते; परंतु सरकारने दंड माफ करून आम्हाला न्याय दिला.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्याचवेळेस विहंग गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत महापालिका स्तरावर निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले होते. याबाबत किरीट सोमय्या यांना दंड किती होता हेदेखील माहिती नाही, अशी टीकाही केली.
आरक्षित भूखंड आणि तो विकसित करून दिल्यास टीडीआर देण्याची योजना अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सुरू केली होती. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त नदंकुमार जंत्रे यांनी विकासकांना बोलावून त्यानुसार आरक्षित भूखंड देताना तो विकसित करून दिल्यास त्याचा टीडीआर दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. आरक्षित भूखंडावर शाळेचे बांधकाम केले. मात्र, तत्कालीन आयुक्त राजीव यांनी शाळा पालिकेकडे हस्तांतरित न करता ‘विहंग’चे बांधकाम बेकायदा ठरविले. जितके चटई क्षेत्र होते, तितकेच बांधकाम केले आहे.
भ्रष्टाचार बाहेर काढल्याने कारवाईझोपडपट्टी भागात राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी राजीव यांनी नोटिसा काढल्या होत्या. त्याविरोधात भूमिका घेतल्याने व त्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढला होता. त्यामुळेच माझ्यावर सूडबुद्धीने त्यांनी ही कारवाई केली होती, असेही ते म्हणाले.
‘मी कुठेही जाणार नाही’
मागील दोन वर्षांपासून सरनाईक पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. परंतु,मी कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच भाजपबरोबर मिळतेजुळते घेण्याबाबत जे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. त्यालादेखील आता वर्षाचा काळ लोटला असल्याने त्यावर बोलणे उचित ठरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
विहंग गार्डन ही इमारत उभारताना महापालिकेने संपूर्ण सीसी दिली होती. त्यानुसारच हे बांधकाम केले आहे. त्यानुसारच स्टॅम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन होत असते, हे कदाचित किरीट सोमय्या यांना माहीत नसेल, किमान त्याचा अभ्यास त्यांनी करायला हवा. ३० दिवसांत माफी मागितली नाही तर त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही सरनाईक यांनी दिला. तसेच येत्या काळात ठाण्यातील भाजप नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.