ठाणे : माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा उल्लेख ‘ब्लॅकमेलर’, असा करुन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. नगरसेवकांनी प्रशासनाकडे मागितलेली माहिती वेळेवर दिली जात नाही. परंतु माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ती तत्काळ दिली जाते, असा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी मंगळवारी महासभेत केला. त्यावर बोलताना महापौर शिंदे यांनी वरील वादग्रस्त वक्तव्य केले. यापुढे नगरसेवकांना एका महिन्यात मागितलेली माहिती देण्यात यावी, असे आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले.विरोधी पक्षनेते पाटील यांनी प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तसेच माहिती वेळेत दिली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. वारंवार माहिती मागवूनही अधिकारी माहिती देत नसतील तर अशा अधिकाºयांवर काय कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी केला. भाजपाच्या नगरसेविकेने देखील अग्निशमन विभागाकडून त्यांना अपेक्षित असलेल्या प्रस्तावाचे नकाशे उपलब्ध करून देण्यात आले नाही, अशी तक्रार केली. पाटील यांनी हा मुद्दा लावून धरल्यावर महापौरांनी पालिका अधिकाºयांचा चांगलाच समाचार घेतला. विकासाच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी विविध माहिती मागवतात. मात्र अनेकवेळा असे निदर्शनास आले आहे की, जी माहिती नगरसेवकांना मिळत नाही ती माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ज्यांचा आम्ही ‘ब्लॅकमेलर’ असाच उल्लेख करायला हवा अशांना दिली जाते, असे खळबळजनक वक्तव्य महापौरांनी सभागृहात केले. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांच्या या वक्तव्याला विरोध न केल्याने अप्रत्यक्षपणे संमती दर्शवली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते ब्लॅकमेलर, महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केला संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:19 AM