ठाणे : केंद्र सरकारच्या सीजीएसटीच्या करप्रणालीमध्ये आणखी सुटसुटीतपणा येण्यासाठी सहज आणि सुलभ अशी नवीन प्रणाली एप्रिल २०२० पासून अमलात येणार असल्याची माहिती मुंबई सीजीएसटी विभागाच्या मुख्य आयुक्त संगीता शर्मा यांनी दिली. पाच कोटींपेक्षा कमी आणि पाच कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या अशा सर्वच उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी ही सोपी करप्रणाली बनविली आहे.
शनिवारी ठाणे शहर आणि ग्रामीण कार्यालयात या नवीन करप्रणालीची सुमारे ३९४ व्यापाºयांनी ‘स्टेक होल्डर’ डे निमित्त माहिती घेतली.व्यापाºयांना या नव्या करप्रणालीची माहिती होण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील केंद्रीय जीएसटीच्या रोड क्रमांक २२ येथील ठाणे शहर, जुन्या पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीमधील ठाणे ग्रामीण तसेच जिल्ह्यातील मीरा रोड, कल्याण, बदलापूर आणि अंबरनाथ आदी ठिकाणच्या कार्यालयांमध्ये ७ एप्रिल रोजी ‘स्टेक होल्डर डे’ साजरा करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध भागांतील व्यापारी आणि उद्योजक तसेच त्यांचे लेखा परीक्षक (सीए) यांच्यासाठी या नव्या करप्रणालीची माहिती होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याचवेळी या नव्या प्रणालीमधील कोणत्याही त्रुटी नोंदवण्याचे आवाहनही केंद्रीय सेवाकर (सीजीएसटी) विभागाच्या वतीने केले आहे. ठाण्यातील रोड क्रमांक २२ येथील मुख्यालयात शर्मा यांनी या संपूर्ण कार्यशाळेचा जिल्ह्यातील अधिकाºयांकडून आढावा घेतला. जीएसटीचा परतावा भरण्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत. यात सुलभ आणि सहजता यावी, यासाठी हे नियोजन केल्याचे शर्मा यावेळी म्हणाल्या. डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या काळात त्रुटी समजावून घेतल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर, ही नवीन करप्रणाली अमलात येणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
ठाणे शहरात संपूर्ण दिवसभरात सुमारे १२५ तर मीरा रोड येथील कार्यालयात १०० अशा २२५ व्यापाºयांनी याची माहिती घेतल्याचे केंद्रीय सीजीएसटी विभागाचे ठाणे शहर आयुक्तालयाचे सहायक आयुक्त शिवम धामणीकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदी भागांतून सुमारे १६९ व्यापाºयांनी या नव्या प्रणालीची माहिती घेतल्याचे ठाणे ग्रामीणचे सहायक आयुक्त अमित समधडिया यांनी सांगितले. व्यापारी आणि लेखापरीक्षकांनी या करप्रणालीची माहिती जाणून घेतल्यानंतर सहज आणि सुलभ प्रणालीचे अनेकांनी स्वागत केल्याचा दावा या अधिकाºयांनी केला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर योजनेचे परीक्षण सुरू
ही योजना प्रत्यक्षात अमलात यायला चार महिने बाकी आहेत. त्याआधी प्रायोगिक तत्त्वावर तिचे परीक्षण चालू आहे. ही अत्यंत चांगली योजना आहे. व्यापारी, उद्योजक आणि सीए यांचा यात फायदा आहे. यातही काही त्रुटी आहेत. त्या लवकरच दूर केल्या जातील.कमलेश साबू, सदस्य, प्रादेशिक परिषद, सीए, मुंबई