ठाणे : शहरातील अनेक केंद्रांवर लसीकरणावरून गोंधळ सुरू आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी सोसायट्यांच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रोग्रेसिव्ह ठाणे रेसिडेंटने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भागातील सोसायट्यांच्या ठिकाणी इशा नेत्रालयाने लसीकरण करण्याची तयारी दर्शविली असून त्यानुसार महापालिकेने परवानगी दिल्यास तब्बल २० सोसायट्यांमधील साडेतीन लाख नागरिकांना त्याचा फायदा होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
ठाण्यातील वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, कनकिया आदींसह २० गृहसंकुलांच्या ठिकाणी अशा पद्धतीने लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. किंबहुना या लसीकरण केंद्राची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारीदेखील या असोसिएशनने दर्शविली आहे. याठिकाणी तब्बल ३ लाख ५० हजारांहून अधिक नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे या भागात लसीकरण केंद्र सुरू करून आम्हीदेखील या चळवळीचा भाग बनण्यास तयार आहोत. असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवदेनात स्पष्ट केले आहे. इशा नेत्रालयाने देखील लसीकरणाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवून आवश्यक ते मनुष्यबळही देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार वसंत विहार क्लब हाऊसमध्ये आम्ही लसीकरण केंद्र उभारू शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने तशा स्वरूपाची परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.