लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जानेवारी २०२१ मध्ये सुरुवात झाली. मात्र, विविध वयोगटांचे लसीकरण आणि लसीकरणाचा प्राधान्यक्रम, यामुळे लसीकरणाची प्रक्रिया मंदावली. त्यातच अपुऱ्या लसीच्या डोसमुळे अनेकदा लसीकरण बंद ठेवण्याची वेळ मनपावर ओढावली. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर उसळणारी गर्दी, मध्यरात्रीपासून लावल्या जाणाऱ्या रांगा व त्यात ज्येष्ठांचे होणारे हाल, या सगळ्या गोष्टी घडल्या. त्याचा मानसिक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
अन्य महापालिकांमध्ये लसीकरणात लोकप्रतिनिधींची लुडबुड दिसून आली. तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याच्या घटनाही घडल्या. मात्र, केडीएमसी हद्दीत अशा प्रकारची अप्रिय घटना घडली नाही. लोकप्रतिनिधींनीही लुडबुड न करता लसीकरण केंद्रे वाढविण्याची मागणी केली. प्रभागात कुठे जागा हवी आहे, त्यासाठी कर्मचारी वर्ग आमच्या खर्चातून देतो, अशी तयारीही दाखविली. काही लोकप्रतिनिधींनी तर केवळ तयारी न दाखविता प्रत्यक्ष कृती केली. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे लसीकरणास मदत झाल्याचे चित्र महापालिका हद्दीत पाहावयास मिळत आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या फाउंडेशनतर्फे लस खरेदी करून ती नागरिकांना मोफत देण्यात आली.
-----------------
ही घ्या उदाहरणे
१. कल्याण ग्रामीण भागात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दोन हजार लसीचे डोस मोफत उपलब्ध करून दिले.
२. शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मोठागाव ठाकुर्ली येथे लसीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच कर्मचारीही दिले. याशिवाय ई-टोकन पद्धत सुरू केली.
३. बिर्ला कॉलेज परिसरात लसीकरण केंद्रासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी जागा उपलब्ध करून दिली.
-------------------------------
डोस शिल्लकच राहत नाहीत..
- पुरेसे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे लसीकरण प्रभावीपणे राबविण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. त्यामुळे काही नागरिक खासगी रुग्णालयांतून लस घेत आहेत. अनेक वेळा महापालिकेस लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण बंद ठेवण्याची वेळ येते.
- काही मोठ्या सोसायट्यांनी खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लस विकत घेऊन सोसायटीत लसीकरण केले आहे. मात्र, त्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे.
-------------------------------
लुडबुड, व्यत्यय नाही
केडीएमसी हद्दीतील लोकप्रतिनिधींकडून लसीकरणाच्या कामात लुडबुड आणि व्यत्यय आणला जात नाही. उलट केंद्रे वाढविण्याची मागणी केली जाते. त्यासाठी जागा देण्यासही ते तयार आहेत. परंतु, पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने त्यांची मागणी मान्य करता येत नाही.
- डॉ. संदीप निंबाळकर, वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी.
-------------------------------
केडीएमसीतील लसीकरण
पहिला डोस - ६,४३,४४७
दुसरा डोस - २,६८,१९४
एकूण डोस - ९,११,६४१
-----------