मीरारोड - दिव्यांग मुलांचा सांभाळ, त्यांचे पालन पोषण करतानाच स्पर्धेच्या जगात त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या १५ दिव्यांग मुलांच्या आईंचा सन्मान करताना सर्वचजण भारावून गेले. महापालिकेने शुक्रवारी मीरारोडच्या रामदेवपार्क भागातील पालिकेच्या धम्म सम्राट अशोक बौद्ध विहार व विपश्यना केंद्रात ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
मीरा भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी दिव्यांग मुलांच्या आईंचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते . आयोजित ह्या कार्यक्रमात सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम देखील दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी सादर करण्यात आले. आमदार गीता जैन व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते दिव्यांग मुलांच्या आईंचा सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपायुक्त कल्पिता पिंपळे, लेखापरीक्षक मंजिरी डिमेलो , विधी अधिकारी सई वडके , सिस्टीम व्यवस्थापक मनस्वी म्हात्रे , सहायक आयुक्त कविता बोरकर , प्रियांका भोसले , कांचन गायकवाड आदींसह अनेक अधिकारी व माजी नगरसेविका उपस्थित होत्या.
दिव्यांग मुलांचा सांभाळ आई म्हणून करताना आलेले अनुभव, विशेष मुल असल्याने आई म्हणून घेतली जाणारी काळजी, मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करताना येणारी आव्हाने व अडचणी आदींच्या चर्चेने दिव्यांग आईंचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली . तर पालिकेच्या वतीने मिळालेल्या सन्मानाने दिव्यांग मुलांच्या आईंनी देखील आभार मानले. पालिकेच्या वतीने दिव्यांग मुलांच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.